लातुर : भारतीय जनता पार्टीच्या शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवडीसाठी गुरुवारी विष्णुदास मंगल कार्यालय येथे माजी मंत्री बबनराव लोणीकर आणि संघटन मंत्री यांच्या भाऊराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी लातूर ग्रामीण जिल्हा जिल्हाध्यक्षपदी रमेश कराड तर शहर जिल्हाध्यक्ष गुरूंनाथ मगे यांची निवड करण्यात आली.
मागील दिड महिन्यापासून जिल्हाध्यक्ष निवडीची चर्चा सुरू होती. गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्षसाठी माजी मंत्री विनायकराव पाटील, भारत चामे, अरविंद पाटील निलंगेकर, रमेश कराड, बालाजी पाटील चाकूरकर, किरण उटगे यांनी तर शहरासाठी सुधीर धुत्तेकर, अजित पाटील कव्हेकर, देविदास काळे, मोहन माने, शैलेश गोजमगुंडे, गुरुनाथ मगे, प्रदीप मोरे, प्रदीप सोळंकी, अनिल पतंगे यांनी मुलाखती दिल्या होत्या.
मुलाखतीनंतर कोअर कमिटीची बैठक झाली, मुलाखत झालेल्या इच्छुकांची नावे पक्षाकडे पाठविण्यात आली. तदनंतर कार्यकर्त्यांच्या बैठकीत माजी मंत्री तथा निवडणूक निरीक्षक लोणीकर यांनी लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून रमेश कराड, शहाराध्यक्षपदी गुरुनाथ मगे यांची नावे घोषित केली.यावेळी लोणीकर म्हणाले, आपण विरोधी पक्षात आहोत, जनतेच्या प्रश्नासाठी साम , दाम, दंड भेद सर्व गोष्टींचा वापर करून लढा, संघर्ष करावा लागणार आहे. हे सरकार जास्त दिवस चालणार नाही. यावेळी खा. सुधाकर शृंगारे, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, माजी आ. सुधाकर भालेराव, गोविंद केंद्रे, पाशा पटेल, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, नागनाथ निडवदे, भारत चामे आदींची उपस्थिती होती.