- राजकुमार जाेंधळेलातूर : लातूर शहर आणि ग्रामीणमध्येही दुरंगी लढत दिसते. शहरात महाविकास आघाडीचे माजी मंत्री आ. अमित देशमुख विरुद्ध महायुतीच्या डाॅ. अर्चना पाटील चाकूरकर तर ग्रामीणमध्ये आ. धिरज देशमुख विरुद्ध आ. रमेश कराड या लक्षवेधी लढती आहेत. दाेन्ही मतदारसंघात काॅग्रेसचे नेटवर्क, साखर कारखाने, जिल्हा बॅक, संस्थांचे अन् आघाडी सरकारच्या काळात उभारलेले काम विरुद्ध महायुती सरकारची कामे याची तुलना हीच प्रचाराची दिशा आहे.
जिल्ह्यात सहाही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशाच थेट लढती दिसत असून, प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख उमेदवार स्वत:चा वा सरकारचा आलेख मांडत एकमेकांना खुले आव्हान देताना दिसत आहेत. व्यक्तिगत आराेप, टीका बाजूला ठेवून उमेदवारांनी कामावरुन ऐकमेकांवर निशाणा साधला आहे.
उदगीरमध्ये क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसाेडे विरुद्ध माजी आमदार सुधाकर भालेराव अशी दुरंगी लढत हाेईल. उदगीरला एकाच टर्ममध्ये मिळालेले राज्यमंत्री आणि लगेचच कॅबिनेट मंत्रीपद आणि कामाचा धडाका प्रचाराचा मुद्दा आहे. अहमदपूरमध्येही राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार बाबासाहेब पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार विनायकराव पाटील यांच्यात थेट सामाना हाेईल. कारखाना, बॅक, संस्थांच्या माध्यमातून उभारलेले जाळे ही आ. बाबासाहेब पाटील यांची जमेची बाजू असून, आमदारकीच्या काळात काेणी किती कामे केली यावर बैठकांमध्ये भर दिला जात आहे.
निलंगा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध काॅंग्रेस महाविकास आघाडीचे अभय साळुंके अशी लढत आहे. तगडे नेटवर्क, कार्यकर्त्यांची मजबूत पेरणी ही भाजपाची जमेची बाजू असून, मतदारसंघाच्या नेतृत्वाचा मुद्दा कळीचा बनवित कामाचा आलेख प्रचारात मांडला जात आहे.
औशातही भाजपा महायुतीचे उमेदवार आ. अभिमन्यू पवार विरुद्ध महाविकास आघाडीचे माजी आ. दिनकर माने यांच्यातील सामाना शेवटच्या टप्प्यात अधिक रंगेल. आमदारकीच्या पाच वर्षातील दहा कामे सांगताे, तुम्ही एक काम सांगा हे आ. पवारांचे आव्हान चर्चेत आहे.