औराद शहाजानी (जि़ लातूर) : गत आठवड्यात किमान व कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे थंडीची तीव्रता कमी झाली होती. दरम्यान, बुधवारी पुन्हा किमान तापमानात घट होऊन 5.5 अंश सेल्सिअस अशी नोंद येथील हवामान केंद्रावर झाली आहे़
गारवा व हवेचा वेग वाढल्याने किमान तापमान घसरले आहे़ परिणामी, थंडी वाढली आहे़ सकाळी १० वा़ पर्यंत ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत़ थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागासह शहरी भागात गल्लोगल्ली शेकोट्या पेटविण्यात येत आहेत़ त्याचबरोबर उबदार कपड्यांचा वापर वाढला आहे़ मंगळवारपासून किमान तापमानात घट होत असल्याचे येथील हवामान केंद्राचे मापक मुक्रम नाईकवाडे यांनी सांगितले़ दरम्यान, किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या आत आल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक पिके कोमजून जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
गत आठवड्यापासूनचे किमान व कंसात कमाल तापमान : 1 जाने 4 (31), 2 रोजी 5 (32.5), 3 रोजी 6 (33), 4 रोजी 7 (32.5), 5 रोजी 8.5 (32), 6 रोजी 8 (32), 7 रोजी 9.5 (31), 8 रोजी 7 (30.5), 9 जानेवारी रोजी 5.5 (29)