उदगीर (जि. लातूर) : एकाला ऑटोचे हप्ते भरण्यासाठी मुदत वाढवून देण्यासाठी कमिशनचे पैसे मागून गंभीर मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला उदगीर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. पी. डी. सुभेदार यांनी शनिवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
आरोपी मजर युनूस शेख याने उदगीर येथील बसस्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर २७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीला कमिशनच्या पैशाबाबात जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण केली. हाताचे हाड मोडून कानावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. शिवाय, जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत उदगीर शहर पोलिस ठाण्यात फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला हाेता. या गुन्ह्याचा तपास उदगीर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे आणि डॅनियल बेन यांनी केला. गुन्ह्याचा तपासानंतर उदगीर येथील विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. उदगीर येथील विशेष सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी न्यायाधीश पी. डी. सुभेदार यांच्यासमाेर झाली. सुनावणीदरम्यान सरकार पक्षाच्या वतीने एकूण दहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. तसेच या खटल्यातील जखमीवर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी यांचीही साक्ष नोंदविण्यात आली. साक्षीदारांची साक्ष आणि संचिकेतील कागदपत्रांच्या अनुषंगाने विशेष सहायक सरकारी वकील ॲड. एस. आय. बिराजदार यांनी युक्तिवाद केला.
अंतिम सुनावणीनंतर न्यायाधीश पी.डी. सुभेदार यांनी आरोपीला कलम ३२६ भादंविनुसार पाच वर्षांचा सश्रम कारावास व दहा हजारांचा दंड, दंड नाही भरल्यास सह महिने सश्रम कारावासाची शिक्षा आणि कलम ३ (२) (५) ॲट्रासिटीअंतर्गत सश्रम जन्मठेपेचा कारावास आणि पाच हजारांचा दंड, दंड नाही भरल्यास तीन महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. यासाठी जिल्हा सरकारी वकील एस. व्ही. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. सहायक सरकारी वकील एस. एम. गिरवलकर, जी. सी. सय्यद यांनी सहकार्य केले. पैरवी पोहेकॉ सिकंदर शेख, एल. एम. बिरादार यांनी केली.