लातूर - शहरातील मोरे नगर परिसरात मालमत्तेच्या वाटणीवरून मुलाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना नारळपाण्यातून विष देऊन खून करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर आईची प्रकृती अत्यवस्थ आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
साधुराम कोटंबे (७२) हे पत्नी गयाबाई यांच्यासह मोरेनगर येथील घराच्या अंगणात १३ जून रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बसले होते. यावेळी मुलगा ज्ञानदीप कोटंबे (२९) याने आई-वडिलांना नारळपाणी पिण्यास दिले. दरम्यान, नारळपाणी कडवट लागत असल्याचे आई-वडिलांनी सांगितले. मात्र मुलाने नारळपाणी कडवटच असते, असे उत्तर दिले. वडील साधुराम कोटंबे यांनी नारळपाणी पूर्ण पिले आणि आई गयाबाई कोटंबे (६५) यांनी दोन घोट नारळपाणी घेऊन ते तसेच ठेवून दिले. काही वेळाने अत्यवस्थ वाटत असल्याचे आई-वडिलांनी सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी उपचारासाठी लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान वृद्ध वडील साधुराम कोटंबे यांचा १४ जून रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. याबाबत उपचार सुरू असलेल्या गयाबार्इंच्या जबाबावरून मुलगा ज्ञानदीप कोटंबे याच्याविरोधात शुक्रवारी रात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरनं १४८/२०१८ कलम ३०२, ३०७ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाटणीतून केले कृत्यज्ञानदीपने आई-वडिलांकडे प्लॉट, घर आणि इतर मालमत्तेच्या वाटणीची मागणी केली होती. यासंदर्भात त्याने आई-वडिलांकडे तगादा लावला होता. यातूनच त्याने जन्मदात्या आई-वडिलांना नारळपाण्यातून विष देऊन खून करण्याचा प्रयत्न केला. यात वडिलांचा मृत्यू झाला.