- हरी मोकाशे
लातूर : रेल्वेने पाणी आणावे लागलेल्या लातूर जिल्ह्यात पाण्याची टंचाई असली तरी, अख्ख्या दक्षिण भारताला इथल्या डाळीचा गोडवा लागला आहे. जिल्ह्यातील दीडशे डाळ मिलमधून दररोज सुमारे तीन हजार टन डाळ तयार होत असून ही डाळ आंध्र प्रदेशातील कर्नुलपासून तमिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत पाठवली जात आहे.
लातूर जिल्हा डाळीच्या पिकांसाठी ओळखला जातो. विशेषत: तूर, हरभरा, उडीद आणि मूग ही पिके घेतली जातात. लाल रंगाच्या तुरीचे आगर म्हणून ‘लातूर’ हे नाव पडले, असेही म्हटले जाते. शिवाय, शेजारच्या कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात तूर विक्रीसाठी लातूरला आणली जाते. येथील बाजार समितीत त्याच दिवशी माप होऊन शेतकऱ्यांना पैसे दिले जातात त्यामुळे राज्यातील इतर बाजारपेठांच्या तुलनेत चांगला दर मिळतो. त्यामुळे महाराष्ट्राबरोबरच तेलंगणा, कर्नाटकातून हा शेतमाल विक्रीसाठी येतो़
जिल्ह्यात डाळ निर्मितीचे १५० प्रकल्प असून ही संख्या मराठवाड्यात सर्वाधिक आहेत़ या प्रकल्पासाठी दररोज ४५ ते ५० हजार क्विंटल तुरीची खरेदी केली जाते़ त्यातून दररोज ३० हजार क्विंटल अर्थात ३ हजार टन डाळ तयार होते. येथील डाळीस महाराष्ट्राबरोबर दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांसह गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे़
डाळीची गुणवत्ता कायम़़लातूरच्या तूर डाळीसह विजय, जॅकी, काबुली हरभरा डाळीस सर्वाधिक मागणी असते, असे उद्योजक नितीन कलंत्री यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना हमीभाव मिळायला हवा...सध्या तुरीस ५ हजारांपर्यंत तर हरभऱ्याला ३७०० रुपयांपर्यंत सर्वसाधारण दर मिळत आहे़ केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीपेक्षा हा दर कमी आहे़ त्यामुळे शेतकरी अडचणीत येऊन इतर पिकांकडे वळण्याची शक्यता असते. त्यामुळे शासनाने नाफेड अंतर्गत जास्तीत जास्त खरेदी केंद्र सुरु करुन शेतमाल खरेदी करणे आवश्यक आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले़
१५ हजार मजुरांना रोजगाऱ़ डाळ उद्योगातून दररोज १५ हजार मजुरांना रोजगार मिळतो़ त्यात बाजार समितीतील हमाल-मापाड्यांची संख्या वेगळी. सदर व्यवसायात कौशल्य असलेल्यांना आणखी चांगला वाव आहे़