लातूर : राज्य सरकारच्या महसूल विभागाकडून विविध महसूली कर वसूल करण्यात येत असतात. मागील आर्थिक वर्षांत महसूल विभागाला ५९ कोटी १७ लाख रुपयांच्या वसूलीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. प्रशासनाने ६१ काेटी २३ लाख रुपयांचा महसूल गोळा करीत उद्दीष्ट पुर्ण केले. या वर्षांत १०३ टक्के वसूलीचे काम झाले आहे. दरम्यान, सलग तिसऱ्या वर्षी प्रशासनाने वसूलीचे उद्दीष्ट पुर्ण केले आहे.
राज्य सरकारकडून मागील आर्थिक वर्षांतील वसूली लक्षात घेऊन जिल्ह्याला ५९ कोटी १७ लाख करवसूलीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. आर्थिक वर्ष २०२२-२३ या वर्षांत महसूल प्रशासनाने ६१ कोटी २३ लाख रुपये वसूल केले आहेत. यात जमीन महसूलीचे २१ कोटी ८४ लाख रुपयांचे उद्दीष्ट मिळाले होते. तर २० कोटी ४८ लाख रुपयांची वसूली केली गेली. याची टक्केवाी ९३.७६ टक्के आहे.
गौण खनिजच्या रॉयल्टीचे उद्दीष्ट ३७ कोटी ३१ लाख रुपये देण्यात आले होते. महसूलीच्या वसूलीसाठी नेहमी प्रयत्न सुरु असतात. मात्र, गौण खनिजावरील रॉयल्टीच्या वसूलीसाठी अधिक प्रयत्न करावे लागतात. जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून वाळू घाटाचे लिलाव झालेले नाहीत. यामुळे रॉयल्टीचे उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी खडी केंद्र व गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी धावपळ करावी लागते. बेकायदा गौण खनिज ावाहतूक करणाऱ्या वाहनांवर नजर ठेवून कारवाई करावी लागते. महसूल विभागाकडून गौण खनिजावरील रॉयल्टी वसूलीतही दमदार कामगिरी करत ४० कोटी ७५ लाख रुपयांची वसूली केली. याची टक्केवारी १०९ टक्के आहे.
औसा तालुक्यात सर्वाधिक वसूली...राज्य सरकारकडून जमीन महसूल व गौण खनिज उत्खनन रॉयल्टी वसूली करण्यासाठी तालुकानिहाय उद्दीष्ट देण्यात आले होते. यात औसा तालुक्याला ७ कोटी ११ लाख रुपये वसूल करण्याचे लक्ष्य होते. तहसील प्रशासनाने १० कोटी ६ लाख रुपये वसूल केले आहेत. याची टक्केवारी १४१.५२ टक्के आहे. यानंतर औसा-रेणापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाने १३ कोटी २० लाख रुपये वसूल केले. याची टक्केवारी १३९.९९ टक्के आहे.
नियोजबद्ध प्रयत्नामुळे वसूली...
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., अपर जिल्हाधिकारी अरविंद लाेखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक वर्षांच्या पहिल्या महिन्यापासूनच वसूलीचे उद्दीष्ट गाठवण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी दरमहा बैठकाही घेण्यात आल्या होत्या. काटेकोरपणे नियोजन केल्यानचे जिल्ह्याने महसूली उद्दीष्टाच्या अधिक महसूल वसूल केला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.