लातूर : समज-गैरसमजाला छेद देत गोवर-रुबेला लसीकरण मोहीम अंतिम टप्प्यात आली असून, ग्रामीण भागात जवळपास उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ग्रामीण व शहरी भाग मिळून ४ लाख ३७ हजार ७८५ पैकी ३ लाख २३ हजार ५८ मुला-मुलींना लस दिली असल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
डॉ. परगे म्हणाले, ग्रामीण भागात ७४.७५ टक्के तर शहरी भागात ७३.७९ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. ग्रामीण भागात ३ लाख ५७ हजार ७१५ चे उद्दिष्ट होते. त्यापैकी २ लाख ६५ हजार २३२ मुला-मुलींना ही लस देण्यात आली आहे. याची टक्केवारी ७४.१५ टक्के आहे. तर शहरी भागामध्ये ८० हजार ७१ टक्के उद्दिष्ट होते. त्यापैकी ५७ हजार ८२६ लाभार्थ्यांना ही लस देण्यात आली आहे. त्याची टक्केवारी ७२.२२ टक्के आहे. २७ नोव्हेंबरपासून ही मोहीम सुरू झाली असून, रविवार व शासकीय सुटी वगळता सर्व शाळांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील शाळा ३१ डिसेंबर अखेर पूर्ण होतील. त्यानंतर राहिलेल्या मुला-मुलींना ही लस देण्यासाठी कार्यक्रम हाती घेणार असल्याचेही डॉ. परगे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सदर उद्दिष्ट प्राप्त केले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत ७७ हजार ५०० मुला-मुलींना लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५९ हजार ८५८ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. त्याची टक्केवारी ७७.२३ टक्के आहे. तर जिल्ह्यामध्ये ४ लाख ९६ हजार ८८३ पैकी ३ लाख ६९ हजार ६१९ मुला-मुलींना लस देण्यात आली. त्याची टक्केवारी ७४.३९ साध्य झाली असल्याचेही ते म्हणाले.
शाळा पूर्ण, अंगणवाड्या सुरू... ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेसह खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांना लस देण्यात येत असून, बहुतांश शाळांत फेरी पूर्ण झाली आहे. जे विद्यार्थी लस घेण्यापासून वंचित आहेत, त्यांना अंगणवाडीसाठी जाहीर केलेल्या कार्यक्रमात ही लस दिली जाईल. पालकांनी कुठलीही भीती न बाळगता आपल्या बालकांना लस टोचून घ्यावी, असे आवाहनही डॉ. परगे यांनी केले आहे.