लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये लातूर विभागीय मंडळाचा दहावीचा ५१.७४ तर बारावीचा ४२.८८ टक्के निकाल लागला आहे.शि
क्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीच्या लेखी, प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्याचा निकालही जुन महिन्यात जाहीर करण्यात आला. मात्र, यामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात आली. दहावीसाठी लातूर विभागातील ११०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी १००१ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. तर ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर बारावी परीक्षेसाठी २००१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १९७५ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. तर ८४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागाचा दहावीचा ५१.७४ टक्के तर बारावीचा ४२.८८ टक्के निकाल लागला असल्याचे लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी सांगितले.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश...दहावी-बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी शिक्षण मंडळाच्या वतीने जुलै-ऑगस्टमध्ये प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा घेण्यात आल्या. आता निकालही जाहीर झाल्याने या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे.