- हरी मोकाशे लातूर - महिनाभरापासून पावसाने ताण दिल्याने मोठे संकट आले आहे. त्यामुळे शासनाने काेरडा दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीची मदत द्यावी, अशा शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी सकाळी लातूर- बार्शी मार्गावरील मुरुड अकोला येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
यंदा विलंबाने पाऊस झाल्याने पेरण्या उशिरा झाल्या. त्यातच बोगस बियाणे, गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झाले. आता जवळपास महिनाभरापासून पावसाने गुंगारा दिला आहे. त्यामुळे पिके वाळत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. पशुधनाच्या चारा- पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. शेतकरीही संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने लातूर तालुक्यातील मुरुड अकोला येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विधी आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार जाधव, जिल्हाध्यक्ष धर्मराज पाटील, माणिकराव गायकवाड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष उषाताई झिंगे, उपाध्यक्ष महारुद्र चौंडे, तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे, करण साखरे, गणेश कदम, गणेश चौंडे, प्रेमचंद पाचपिंडे, आंबऋषी काळे, मधुकर मायंदे, श्रीराम कदम, दशरथ बनसोडे, शाम माळी, शशिकांत भोसले आदी सहभागी झाले होते. यावेळी मंडळ अधिकारी एम.डी. बेजगमवार यांना निवेदन देण्यात आले.
तासभर वाहतूक ठप्प...स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. पीकविम्याची २५ टक्के अग्रीम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. कोणतेही निकष न लावता सरसकट कर्ज माफी करावी. सन २०२२- २३ मधील अतिवृष्टीचे अनुदान, प्रोत्साहनपर अनुदान, उर्वरित पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा. चालू वर्षाचे कृषीपंपाचे वीजबिल, शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावी आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.