लातूर : नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांतील रुग्णांना वेळेत औषध न मिळाल्याने ३४ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासन सतर्क झाले असून, दक्षता व अतिदक्षता विभागातील डॉक्टरांची बैठक मंगळवारी घेण्यात आली. औषधांचा साठा तसेच यंत्रसामग्री आहे की नाही, याची खात्री करून घेण्यात आली. तसेच जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून किती औषध खरेदी करण्यात आली आहेत, याचीही पडताळणी करण्यात आली.
विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयासाठी ५०० खाटा मंजूर आहेत. विशेष म्हणजे साडेसातशे खाटांवर रुग्णसेवा दिली जाते. अडीचशे खाटा मंजूर खाटांपेक्षा जास्त आहेत. रुग्णालयात एकूण २४ वॉर्ड असून यात सात अतिदक्षता विभाग आहेत. मार्डचे २०० आणि निमित्त १०० डॉक्टर रुग्णसेवेत आहेत. या सर्व डॉक्टरांची बैठक अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांनी घेतली. रुग्णसेवेचा आढावा घेऊन संबंधितांना काही सूचनाही केल्या आहेत. अतिदक्षता विभागातील उपलब्ध साधनसामग्री व्यवस्थित असल्याची खात्री करून घेण्यात आली. किती रुग्णांवर उपचार सुरू आहेत, याचीही माहिती अधिष्ठातांनी यावेळी जाणून घेतली.
नियोजन समितीच्या निधीतून २ कोटी ९४ लाखांच्या औषध खरेदीला मंजुरी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासाठी जिल्हा नियोजन समितीने २ कोटी ९४ लाख रुपये औषधांसाठी मंजूर केले आहेत. यातून अनेक औषधांची खरेदी झाली असून, काही औषधांसाठी निविदा काढण्यात आली आहे. आवश्यक असणारे सर्व औषधे रुग्णालयाच्या औषध भंडारमध्ये आहेत. हाफकिनकडून औषधे मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे स्थानिक स्तरावरून आवश्यक असणाऱ्या औषधांची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयामध्ये सध्यातरी औषध तुटवडा नाही.
उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्राशी शासकीय महाविद्यालयाचा समन्वय..!
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यंत्रणेचा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याशी समन्वय असतो. त्यांच्याकडे औषधे असतील तर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयाला मागून घेतली जातात. श्वानदंश, सर्पदंशवरील इंजेक्शन अनेकदा त्यांच्याकडून घेतली आहेत. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून हा समन्वय त्यांच्याशी असतो, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन जाधव यांनी सांगितले.