लातूर : जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या अवैध दारु अड्ड्यांवर लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी सलग दाेन दिवस टाकलेल्या छापासत्रात १८ जणांना अटक केली आहे. याबाबत बुधवारी १५ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, देशी-विदेशी, हातभट्टी, रसायनासह वाहन असा १ लाख ८८ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राउत यांच्या आदेशानुसार लातूर जिल्ह्यात सलग दाेन दिवस अवैध दारु, हातभट्टी अड्ड्यांसह ढाब्यावर छापा मारण्यात आला आहे. दरम्यान, काही ढाबा मालक, चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई लातूर आणि उदगीर विभागाच्या पथकांनी संयुक्तपणे केली आहे. राबविण्यात आलेल्या माहिमेत १५ गुन्हे दाखल केले असून, १८ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २७ लिटर देशी दारु, ५०० लिटर हातभट्टी दारु, ४०० लिटर विदेशी दारु, १०० लिटर ताडी आणि २ हजार ४०० लिटर हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे रसायन जप्त केले आहे.
ही कारवाई लातूर विभागाचे निरीक्षक आर.एस. काेतवाल, आर.एम. चाटे, दुय्यम निरीक्षक एल.बी. माटेकर, ए.के. शिंदे, स्वप्नील काळे, ए.बी. जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, निलेश गुणाले, मंगेश खारकर, जवान अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्याेतीराम पवार, एस.जी. बागेलवाड, संताेष केंद्रे, एकनाथ फडणीस, पुंडलिक खडके, विक्रम परळीकर यांच्या पथकाने केली.