लातूर : पालनपाेषण करीत नाहीत, उलट छळ करत असल्याची घटना लातुरात घडली. याबाबत त्रस्त झालेल्या ज्येष्ठ महिलेने शिवाजीनगर पाेलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी मुलगी, जावई आणि सुनेविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी अरुणाबाई काशीनाथ साबळे (६५, रा. वाळूज, औरंगाबाद, ह.मु. झिंगणप्पा गल्ली, लातूर) यांचा मुलगा मयत झाल्यानंतर आम्ही तुमचा सांभाळ करताे, असे म्हणून त्यांची मुलगी, जावई आणि सून यांनी त्यांच्या घरी घेऊन गेले. दरम्यान, वयाेवृद्ध आईची काेणतीही देखभाल, विचारपूस, पालनपाेषण न करता तिघांनी फिर्यादीला धमकावणे, शिवीगाळ करणे, ज्येष्ठ नागरिक म्हणून सांभाळ न करणे, असे प्रकार घडत गेले. तू घरात शांत पडून राहा, आवाज करायचा नाही, तुझे घर आम्ही विकले आहे. तू बाहेर गेली तर परत काेठे जाणार? आमच्याकडे परत आली तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशा सतत धमक्या देत राहिले. यातून त्यांना असुरक्षित वाटले, त्याचबराेबर या छळाला कंटाळलेल्या अरुणाबाई काशीनाथ साबळे यांनी अखेर लातुरातील शिवाजीनगर पाेलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
याबाबत पाेलिसांनी चाैकशी करून मुलगी वैशाली आनंद गुरव, जावई आनंद गाेपाळ गुरव (रा. सिडकाे, औरंगाबाद) आणि सून अर्चना रतन साबळे (रा. शिवाजीनगर, औरंगाबाद) यांच्याविराेधात कलम २४, ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालनपाेषण आणि कल्याण अधिनियम, कलम ५०४, ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिन्याला लातुरात दाेन गुन्हे दाखल...दिवसेंदिवस मुलगा, सूनेकडून घरातील ज्येष्ठ नागरिकांचा छळ हाेण्याच्या घटनांत वाढ हाेत आहे. दरम्यान, आता मुलगी आणि जावई यांनीही छळ केल्याची तक्रार एका त्रस्त महिलेने दाखल केली आहे. लातूर जिल्ह्यात महिन्याला अशा स्वरुपाच्या किमान दाेन तक्रार दाखल हाेतात. याबाबत तातडीने दखल घेत ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर