लातूर : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत भाजपा पुन्हा बाजी मारणार का? याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. लातूरमध्ये भाजपाचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे आणि काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत यांच्यात सामना रंगत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे सुधाकर श्रृंगारे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना 99893 मते मिळाली असून काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत यांच्या पारड्यात 48831 मते पडली आहेत.
लातूर लोकसभा मतदारसंघात 10 लाख 54 हजार 677 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून 62.68 टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का वधारल्याने ही मते कुणाच्या पारड्यात जातात, हे पाहावे लागणार आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे डॉ. सुनील गायकवाड यांनी विजय मिळवला होता. मात्र, यावेळी त्यांची उमदेवारी कापून जिल्हा परिषदेचे सदस्य सुधाकर शृंगारे यांना देण्यात आली. त्यामुळे लातूरमध्ये भाजपा आपला झेंडा फडकवणार की काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.