- हरी मोकाशे (लातूर)
यंदाचा दीपावली पाडवा सण हा शेतकऱ्यांसाठी उच्चांकी भाव देणारा ठरला आहे़ दोन महिन्यांच्या कालावधीत पहिल्यांदाच उडिदाचा दर ६ हजारांपर्यंत पोहोचला़, तर सोयाबीनला कमाल दर ३ हजार ४८१ रुपये असा मिळाला़ विशेष म्हणजे, लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत पाडव्यादिवशी ३४ हजार १४६ क्विं़ शेतमालाची आवक झाली होती़
राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गणल्या जाणाऱ्या लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत दीपावली सणानिमित्ताने शेतीमालाची आवक वाढली होती़ यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने शेती उत्पादनात जवळपास ६० टक्क्यांनी घट झाली़ निघालेल्या उत्पादनातून सण आनंदात साजरा करता यावा म्हणून बहुतांश शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री करण्यास सुरुवात केली होती़ उत्पादनात घट झाल्याने सुरुवातीपासूनच सोयाबीनला ३ हजार रुपयांच्या पुढे दर मिळत होता.
पाडव्यादिवशी २६ हजार ९८५ क्विं़ची आवक होऊन सर्वसाधारण दर ३ हजार ४३१ रुपये मिळाला़ आधारभूत किमतीच्या तुलनेत हा दर अधिक ठरला आहे़ आगामी काळात सोयाबीनच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे काही शेतकरी शेतमाल तारण योजनेचा लाभ घेत आहेत़पाडव्यादिवशी उडिदाची आवक २ हजार ४१ क्विं़ होऊन सर्वसाधारण दर ५५५० रुपये मिळाला़ यंदाच्या खरीप हंगामातील उडिदाला प्रथमच सर्वाधिक भाव मिळाला आहे.
यापूर्वी शेतकऱ्यांची प्रति क्विं़ मागे १००० ते १२०० रुपयांची लूट होत होती़ दरम्यान, बाजरीस सर्वसाधारण दर २२५०, गहू- २०००, हायब्रीड ज्वारी- १३००, रबी ज्वारी- २५००, पिवळी ज्वारी- ३६००, मका- १३००, हरभरा- ५०००, साळी- १२००, मूग- ५०००, तूर- ४०५०, एरंडी- ३५११, करडई- ३५००, तीळ- ११ हजार रुपये, गुळास प्रति क्विं़ ३०६१ रुपये असा दर मिळाला आहे.