औसा (जि.लातूर) : शहरातील नाथनगर येथे प्लास्टिक पाईप ठेवलेल्या गोदामास अचानक आग लागून गोदामातील संपूर्ण प्लास्टिक पाईप आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून जळून खाक झाले आहे. आग एवढी भीषण होती की आगीचे धूर एक किलोमीटर लांबपर्यंत दिसत होते. अग्निशमन विभागाच्या पथकाने दीड तास प्रयत्नांची पराकाष्टा करीत आग आटोक्यात आणली आहे.
औसा शहर पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइन टाकण्याचे काम चालू असून प्रगती कन्स्ट्रक्शन यांच्याकडून हे काम केले जात आहे. पाईपलाईन कामाचे एचडीपीई पाईपची साठवणूक कन्स्ट्रक्शन कंपनीकडून नाथनगर भागातील केदारनाथ मंगल कार्यालयाच्या पाठीमागे एका गोदामात केली होती. सदरील प्लास्टिक पाईपच्या गोदामास मंगळवारी दुपारी साडेबाराच्या अचानक आग लागली. गोदामात प्लास्टिक पाईप असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण करत संपूर्ण गोदाम आगीत जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीचे लोट पाहताच परिसरातील लोक घटनास्थळी जमा झाले.
स्थानिक लोकांनी तात्काळ आगीची माहिती नगर पालिकेला दिली. आग आजूबाजूच्या परिसरात पसरण्याची भीती लोकांना वाटू लागली पण आग नियंत्रणाबाहेर जाण्याअगोदर अग्निशमन दलाने सुमारे दीड ते दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात आणण्यासाठी औसा, निलंगा, लातूर येथील अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले होते. आगीत गोदामाच्या शेजारील सतीश कल्याणी यांच्या घराचे खिडकांच्या काचा फुटल्या असून घराचे नुकसान झाले आहे.
लाखो रुपयांचे नुकसान...प्राथमिक तपासात आगीच्या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळाला मुख्याधिकारी मंगेश शिंदे, पोलिस निरीक्षक सुनिल रेजितवाड, न.प कर्मचारी बेलेश्वर कल्याणी, रोळे यांनी भेट दिली. आगीत नेमके किती नुकसान झाले हे अद्याप पर्यंत समजू शकले नाही.