लातूर: लातूर मुंबई रेल्वे सीएसटी ऐवजी दादरपर्यंतच जात आहे. ती वेळेवर पोहचत नसल्याने विद्यार्थी, नागरिक आणि मंत्रालयात बैठकीसाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांची कामे खोळंबली आहेत. अनेकदा ही रेल्वे घाटकोपरला बराच वेळ थांबत असल्याने लातूर, धाराशिव, बार्शी आदी भागातून जाणाऱ्या प्रवाशांची तारांबळ होत आहे.
लातूरहून ही रेल्वे दररोज रात्री १०.३० वाजता निघते. सीएसटी मुंबईला पोहचण्याची वेळ ७.५५ आहे. परंतू घाटकोपर आणि दादरपर्यंतच जायला कधी ९ तर दहा ते साडे दहाची वेळ होत आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ वाजता बैठक असते, किंवा स्थानकापासून काही अंतरावर कुणाला १० वाजेपर्यंत पोहचायचे असते. मेडिकल, इंजिनिअरिंग कॉलेज, मंत्रालयात जाणारे अधिकारी, काम घेऊन जाणारे नागरिक वेळेत पोहचत नाही. गेल्या दोन दिवसांपूर्वी घाटकोपरमध्ये ट्रॅकवर उतरून प्रवाशांना जावे लागले. कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. प्रवाशांची घाई पाहून अनेकांनी जादा पैसे घेतल्याही प्रवाशांची ओरड आहे.
ज्येष्ठ नागरिकांचे हाल...घाटकोपर येथे रेल्वेतून उतरत असताना ज्येष्ठ नागरिकांना हाकनाक त्रास झाला. सामान उतरविण्यासाठी तेथील लोकांनी पैसे उकळले. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास झाला शिवाय, आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला. लातूरहून दादरपर्यंत जाणारी रेल्वे सकाळी ७ वाजून २७ मिनिटाला पोहचण्याची वेळ आहे. मात्र, या रेल्वेला नेहमीच उशिर होत असल्याने प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
परतीचा प्रवास तुलनेने सुखाचा...मुंबईहून मात्र लातूरकडे येणारी रेल्वे छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटते. तिचा प्लॅटफॉर्मही ठरलेला असतो. त्यामुळे लातूरकरांना मुंबईहून येतानाचा प्रवास मात्र तुलनेने सुखकर होत आहे. मागील काही दिवसांपासून लातूरहून सीएसटी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना दादरपर्यंतच जावे लागत आहे. तिथून पुढे जाण्यासाठी प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
प्लॅटफॉर्मचे काम सुरू असल्याने अडचण...लातूरहून मुंबई सीएसटीला जाणारी रेल्वे ज्या प्लॅटफॉर्मला जाते त्या प्लॅटफॉर्म क्र. ९ चे काम सुरू आहे. त्यामुळे ही रेल्वे सध्या तरी दादरपर्यंत जात आहे. दादरला कधी कधी वेळेत प्लॅटफॉर्म मिळत नाही. त्यामुळे उशिर होत आहे. काम पूर्ण झाल्यावर सीएसटीपर्यंत ही रेल्वे जाईल. सध्या तरी काम किती दिवस चालेल हे आपणाला सांगता येणार नाही, अशी माहिती लातूर येथील रेल्वे स्थानक प्रमुख आर.बी. गायकवाड यांनी सांगितले.