लातूर: महापालिका प्रशासनाने पावसाळापूर्व स्वच्छतेची कामे हाती घेतली आहे. ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही, अशा ठिकाणी स्वच्छतेला अधिक प्राधान्य दिले जाते. मात्र, दोन वर्षांपासून रिंगरोडवर असलेली राष्ट्रीय महामार्गाची नाली शहराचे पाणी वाहून नेत नसल्याने जवळपास सात ठिकाणी गटारीच्या पाण्याची दुर्गंधी वाढली आहे. या पाण्याला मार्ग सापडत नसल्याने अनेकांच्या घरात पाणी जाते. कायमस्वरूपी मार्ग निघत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
राजीव गांधी चौकातून पुढे कन्हेरी चौक, महात्मा बसवेश्वर चौक, बाभळगाव नाका, गरूड चौक या राष्ट्रीय महामार्गावर पावसाचे पाणी रस्त्यावर जमा होऊ नये, म्हणून रस्त्यालगत नाली तयार करण्यात आली आहे. मात्र, सदरील नाली करीत असताना शहरातून गटारीचे वाहणारे पाणी नेमके रिंगरोडच्या नालीतून जाईल की नाही, याबाबतची खातरजमा न करता काम आटोपण्यात आले. मागील दोन वर्षांपासून सात ठिकाणी गटारीच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने त्या भागातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शिवाय, पावसाळा किंवा नळाला पाणी आले तरी नालीचे पाणी रस्त्यावर वाहते. यासंदर्भात नागरिकांनी वारंवार ओरड करूनही प्रशासन दखल घेत नाही. कधी आयुक्त तर कधी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पाणी निचरा न होणाऱ्या भागाची पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी आयुक्तांकडे केली. मात्र, अजूनही या पाण्याला मार्ग कसा काढावा, याचा मार्ग मनपा प्रशासनाला निघत नसल्याने गटारीच्या पाण्याला तळ्याचे स्वरूप आले आहे.
इथे अडले गटारीचे पाणी...
लातूर शहरातील प्रभाग १३ अंतर्गत असलेल्या रहिम नगर, खाडगाव स्मशानभूमी, खाडगाव चौकातून पुढे हाकेच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे. रहिम नगर भागात तर जवळपास दोन एक रिकाम्या जागेत जणू शेततळेच झाले आहे. राजीव गांधी चौकातून पुढे बाभळगाव नाका, इस्लामुरा भागात दोन ठिकाणी हायवेच्या नालीची उंची, मनपाच्या नालीला मिळत नसल्याने शहराच्या गटारीच्या पाण्याचा प्रश्न दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. या पाण्याला मार्ग काढणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय, नवीन रेणापूर नाक्याहून पुढे गरुड चौकाकडे जाताना डी मार्टसमोरच्या नाल्याचे पाणीही मुख्य रस्त्यावर वाहते.
...तर हजारो घरात शिरणार पाणी
मनपा प्रशासन पावसाळापूर्व स्वच्छतेत नाल्यातील कचरा काढत आहे. पण ज्या भागात बारा महिने पाण्याचा निचरा होत नाही, तिथे काय उपाययोजना आहेत. इस्लामपुरा, रहिम नगर, खाडगाव स्मशानभूमी आदी भागात नळाचे पाणी आले तरी रस्त्यावर वाहते. पावसाचे पाणी कुठे जाणार अन् मनपा कुठे सोडणार हा मोठा प्रश्न आहे. या पाण्याला तात्काळ मार्ग नाही काढला तर पावसाळ्यात हजारो नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची भीती व्यक्त होत आहे.