लातूर : शहरातील अनधिकृत होर्डिंग काढून घेण्यासाठी मनपाने रविवार पर्यंतची मुदत दिली होती.ती मुदत संपताच सोमवारी एकाच दिवशी अशा ११ अवैध होर्डिंग संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले. पालिकेने एकाच दिवसात ही कारवाई केली. आतापर्यंत एकूण १५ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
मनपाने सोमवारी २ होर्डिंग व १५ अनधिकृत बॅनर काढूनही टाकले. अवैध होर्डिंग प्रकरणात मनपाने कारवाई सुरू केली आहे.त्याअनुषंगाने उपायुक्तांनी क्षेत्रीय अधिकारी आणि मालमत्ता व्यवस्थापकांची बैठक घेतली. कार्यवाहीला गती देवून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याबाबत त्यांनी आदेशित केले. होर्डिंग प्रकरणात प्रारंभी पालिकेच्या वतीने संबंधित एजन्सी व मालमत्ता धारकांना अवैध होर्डिंग काढून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यासाठी रविवार पर्यंतची मुदत दिली होती. मुदतीनंतर ही कारवाई केली आहे.
गुन्हे दाखल होण्याची संख्या पोहोचली १५ वर...सोमवारी क्षेत्रीय कार्यालय ए मार्फत २, बी क्षेत्रीय कार्यालया मार्फत ३,सी क्षेत्रीय कार्यालयामार्फत २ आणि क्षेत्रीय कार्यालय डी मार्फत ४ असे एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले. आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची संख्या १५ वर पोहोचली आहे. होर्डिंगधारकांनी तत्काळ होर्डिंग काढून घ्यावेत, असे आवाहनही केले आहे.
होर्डिंग काढून घ्या, अन्यथा गुन्हे दाखल होतील...स्ट्रक्चरसहित तात्काळ काढून घ्यावेत. असे होर्डिंग निदर्शनास आल्यास संबंधित मालमत्ताधारक व एजन्सी धारकावर क्षेत्रीय कार्यालयामार्फत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या होर्डिंगमुळे एखादी दुर्घटना किंवा अपघात झाल्यास मालमत्ताधारक व एजन्सी धारकावर कार्यवाही करण्यात येणार आहे. युनिपोल संदर्भातही निर्णय घेतला जाईल. - डॉ. पंजाब खानसोळे, मनपा उपायुक्त
स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करा; युनिपोल एजन्सीला नोटीस...।शहरातील मुख्य रस्त्यांवर दुभाजकांमध्ये उभारण्यात आलेल्या युनिपोलच्या साईजबाबत तसेच रहदारीला अडथळा होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. त्या अनुषंगाने कंत्राटदारास नोटीस पाठविण्यात आली आहे.युनिपोलची साईज व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतनचे स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करण्यासंदर्भात एजन्सीला सुचित करण्यात आले आहे. मात्र अद्याप एजन्सीकडून रिपोर्ट सादर झालेला नाही. दरम्यान, मिनी मार्केट चौक परिसरात युनिपोलवरील जाहिरात दिसत नसल्याने झाड तोडल्याची घटना एप्रिलमध्ये घडली होती. या अनुषंगानेही दुसरी नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे.