लातूर: महानगरपालिकेचे शिवछत्रपती वाचनालय गोरगरीब मुलांच्या अभ्यासिकेचे प्रमुख केंद्र ठरत असून या वाचनालयामध्ये स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने हजार ते दीड हजार ग्रंथ उपलब्ध आहेत. शिवाय, मॅक्झिन आणि वृत्तपत्रही उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांसाठी हे ग्रंथालय २४ तास खुले असून तीन-चार वर्षात अडीचशेहून अधिक विद्यार्थी या ग्रंथालयात अभ्यास करून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. एवढेच नाही तर त्यांची वेगवेगळ्या पदांसाठी निवड झाली आहे.
शहरामध्ये व्यवसाय म्हणून अनेक ठिकाणी वातानुकूलित स्टडी रूम उभारल्या आहेत. त्या ठिकाणी सातशे ते आठशे रुपये मासिक शुल्क आकारले जाते. दिवसभरातील बारा तासासाठी हे शुल्क असते. लातूर महापालिकेने मात्र नाम मात्र दरामध्ये २४ तास वातानुकूलित अभ्यासिका उपलब्ध करून दिली आहे. या अभ्यासिकेमध्ये हजार ते बाराशे ग्रंथ, वेगवेगळ्या भाषेत ४५ वर्तमानपत्र तसेच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असलेले मॅक्झिन आहेत. या ग्रंथसामुग्रीमुळे वरिष्ठ लिपिक पासून पीएसआय, अभिलेखापाल, सहसंचालक औषध सुरक्षा अशा पदावर गेल्या दीड वर्षात १३ जणांची निवड झाली आहे. यूपीसी परीक्षा सर करण्याचे उद्दिष्ट आता ग्रंथालयाचे आहे. त्या अनुषंगाने ग्रंथ संपदा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने १६ कॅमेऱ्यांचे सुरक्षा कवच...स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय २४ तास खुले असून सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीच्या बाहेरून १६ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांसाठी स्वच्छालय तसेच शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली आहे. दररोज ६० ते ७० विद्यार्थी या ग्रंथालयाचा व अभ्यासिकेचा लाभ घेत आहेत.
अंध वाचकांसाठी दर्जेदार दीडशे ग्रंथशहरातील अंध वाचकांसाठी ब्रेन लिपीमध्ये १५० ग्रंथ उपलब्ध आहेत. सध्या नियमित दहा अंधवाचक ग्रंथालयाच्या सेवेचा लाभ घेत आहेत. मराठी विश्वकोष तसेच मृत्युंजय सारखी कादंबरी ब्रेनलिपीमध्ये उपलब्ध आहे. लातूर नॅब या संस्थेने त्यांच्याकडील ब्रेन लिपीमधील साहित्य शिवछत्रपती ग्रंथालयाला सुपूर्द केले आहे. त्याचाही फायदा अंध वाचकांना या ग्रंथालयात होत आहे. रिलायन्स फाउंडेशनकडून वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या बातम्या ब्रेन लिपीमध्ये दर पंधरा दिवसाला वाचायला या ग्रंथालयात उपलब्ध होतात. त्यामुळे चालू घडामोडीची माहिती त्यांना मिळत आहे.
शहरात आठ ठिकाणी वाचन कट्टा...महानगरपालिकेने वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी शहरात प्रत्येक झोनमध्ये प्रत्येकी दोन ठिकाणी वाचन कट्ट्याची निर्मिती केली आहे. वाचन कट्टा सकाळी दहा वाजेपर्यंत सुरू असतो. त्या ठिकाणी वृत्तपत्र उपलब्ध करून दिले आहेत. या कट्ट्यावर अनेक वाचक आपल्या वाचनाची आवड जोपासत आहेत.