लातूर : महानगरपालिकेच्या वतीने सध्या मालमत्ता कराची वसुली मोहीम सुरू करण्यात आली असून ३१ मार्च अखेरपर्यंत महसुली मोहीम राहणार आहे. दरम्यान, ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकला आहे,अशा मालमत्ता धारकांच्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईचा इशारा देण्यात आला असून पहिल्या टप्प्यात डीझोन अंतर्गत दोघांच्या नळाचे कनेक्शन तोडण्यात आले आहे.
लातूर महानगरपालिकेच्या हद्दीत 98 हजार पेक्षा अधिक मालमत्ता धारकांची संख्या आहे. त्यांच्याकडे कोट्यावधी रुपयांचा मालमत्ता कर थकलेला आहे.थकीत मालमत्ता धारकांकडे वसुलीसाठी मनपाने मोहीम सुरू केली आहे. जे मालमत्ताधारक एकरकमी थकीत मालमत्ता कर भरतील, त्यांना व्याजामध्ये शंभर टक्के सवलत दिली जात आहे. मात्र तरीही अनेक मालमत्ता धारकांकडून वसूलीला प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कर थकलेला आहे, त्यांच्या मालमत्तांवर कारवाई केली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून डीझोन अंतर्गत दोघा मालमत्ता धारकांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले. त्यांच्याकडे प्रत्येकी दीड लाखाच्यावर मालमत्ता कर थकलेला असल्याचे क्षेत्रिय अधिकारी बंडू किसवे यांनी सांगितले. दरम्यान सोमवारी डी क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत राबवलेल्या मोहिमेमध्ये अधिकारी बंडू किसवे यांच्यासह पथकात कर निरीक्षक तहेमीद शेख, स्वच्छता निरीक्षक आक्रम शेख, देवेंद्र कांबळे, राज मुबिन, महेश, वैभव स्वामी, गोविंद रोंगे, किशोर भालेराव, संगमेश्वर बेलकूंडे आदींचा सहभाग होता.