लातूर : नीटमध्ये गुणवाढ करण्याचे आमिष दाखवून पालकांना गंडविणाऱ्या आरोपींचा तपास महाराष्ट्र, झारखंड, उत्तराखंडच्या दिशेने फिरत असला तरी लातूरचे प्रकरण आणि देशभरातील पेपरफुटीच्या भानगडींची दिशा आतापर्यंत तरी स्वतंत्र आहे, असा अंदाज तपास कार्यात गुंतलेली यंत्रणा व्यक्त करीत आहे.
एक मुख्याध्यापक, एक शिक्षक असे दोन आरोपी अटकेत आहेत. त्यांना मध्यस्थ म्हणून काम करणारा आणि दिल्लीत कनेक्शन असलेला एक असे दोघे सापडलेले नाहीत. ज्या पालकांची चौकशी झाली, त्यांनी गुणवाढीच्या आमिषाला बळी पडून पैसे दिले हे कबूल केले आहे. परंतु, त्याचवेळी लाभ झाला नाही, म्हणून पैसे परत मिळाल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे कोणाला प्रश्नपत्रिका मिळाली, संभाव्य प्रश्न मिळाले अथवा पेपरफुटीशी थेट संबंध आला का, याची शहानिशा होणे बाकी आहे.
जिल्हा परिषद शिक्षक आणि नीट प्रकरणाचा गुंता...
नीट प्रकरण आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा संबंध कसा हा विचार करुन सगळेच डोके खाजवत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीप्रमाणे गुणवाढ करुन देतो, अशी बतावणी करुन पैसे गोळा केले. काम नाही झाले म्हणून काहींना परत केले. तसेच खात्यावर संशयास्पद व्यवहार आढळले. जिल्हा परिषद शिक्षकांकडे नीटच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र कसे काय, याची उत्तरे आरोपी समाधानकारक देऊ शकले नाही. तसेच आरोपींची पुढची साखळी ताब्यात आली नाही. त्यामुळे तपासाचे वर्तुळ पूर्ण होत नाही.
डाव अर्ध्यावरती मोडला...
गुणवाढ करतो म्हणून पैसे घ्यायचे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल इतपत कोणाला योगायोगाने गुण मिळाले अर्थात अंदाजे गोळी लागली तर पैसे. अन्यथा रक्कम परत अशी हमी देऊन पैसे जमविण्याचा घोटाळा प्रथमदर्शिनी दिसत आहे. एकंदर, आमिषाला बळी पडलेल्या पालकांना प्रश्नपत्रिका मिळाली, गुण वाढले असे काहीही निष्पन्न झालेले नाही. त्यांचा डाव अर्ध्यावरती मोडला आहे, हे आतापर्यंतचे सत्य दिसत आहे. हाच उद्योग त्यांनी इतर परीक्षांसाठीही केला. त्यामुळे आरोपींसाठी केवळ नीट हाच उद्योग नाही.