लातूर : नीटमध्ये (नॅशनल एलिजीबिलीटी एन्टरन्स टेस्ट) गुणवाढीचे आमिष दाखवून फसवणूक करणारे दाेघे सीबीआय काेठडीत असून, दाेन्ही आराेपीसह इतर संशीयीतांच्या चाैकशीत तपासाचा ‘फाेकस’ महाराष्ट्र-बिहार कनेक्शनवर आहे. अटकेतील आराेपीच्या काेठडीची मुदत शनिवारी संपत असून, त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणात दिल्लीच्या गंगाधरलाही लातुरात आणले जाणार असल्याची माहिती समाेर आली आहे.
नीट गुणवाढीच्या संदर्भाने लातुरात दाखल गुन्ह्याचा तपास सीबीआयकडून केला जात असून, पथक आठ दिवसांपासून मुक्कामी आहे. चाैकशीतून अनेक धागेदाेरे समाेर येत आहेत. काेठडीतील आराेपीशी काेणा-काेणाचा संपर्क आला आहे, ते आता तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. चाैकशीत आराेपींचा आकडा वाढण्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला आहे.
सीबीआयच्या एका पथकाकडून तपास...
सीबीआयच्या एकाच पथकाने काेठडीतील आराेपीची कसून चाैकशी केली असून, त्यांच्या हाती महत्वाचे धाेगेदाेरे लागले आहेत. यात तिघा संशीयीतांची नावे समाेर आल्याने ते चाैकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. आता हाती लागलेल्या यादीतील पालकही रडारवर आहेत.
'टीईटी' परीक्षेतही गोंधळ; बड्या अधिकाऱ्यांशी लिंक...
नीटसह इतर परीक्षामध्येही गैरप्रकार झाल्याचा संशय तपास यंत्रणांना असून, टीईटी परीक्षेतील धागेदाेरे हाती आले आहेत. यातील बड्या अधिकाऱ्यांशी काहींची ‘लिंक’ असल्याचेही समाेर आले आहे. या ‘लिंक’चा शाेध सीबीआयकडून घेतला जात आहे.
चौकशीत अनेकांची कुंडली लागली हाती...
आठ दिवसांच्या चाैकशीत अनेकांची कुंडली सीबीआयच्या हाती लागल्याची माहिती समाेर आली आहे. आराेपींनी केलेले आर्थिक व्यवहार, संपर्कातील व्यक्ती आणि संशयास्पद नावे, पालकांची यादीच समाेर आल्याने त्यांचीही चाैकशी केली जाणार आहे.
स्थानिक यंत्रणेची तपासासाठी मदत...
या गुन्ह्याचा प्राथमिक तपास स्थानिक पाेलिसांनी केला. चाैकशीदरम्यान तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून एक-एक धागा उकलण्याचे काम सीबीआय पथकाकडून करण्यात येत आहे. मध्यस्थ असलेला इरण्णा आणि दिल्लीतील गंगाधारच्या कारमान्याचा उलगडाच काेठडीतील आराेपींकडून झाल्याचे समाेर आले आहे.
इरण्णाचा सीबीआयलाही गुंगारा...
लातुरात गुन्हा दाखल गुन्ह्यातील चारपैकी इरण्णा काेनगलवार हा गुंगारा देत पसारच आहे. ताे पाेलिसांच्याही हाती लागला नाही. आता सीबीआयच्या पथकांनाही ताे चकवा देत असून, त्याच्या अटकेसाठी सीबीआयची पथके मागावर आहेत.