राजकुमार जाेंधळे
लातूर : जिल्ह्यातील वांगदरी (ता. रेणापूर) येथील एका व्यक्तिविराेधात धनादेश न अनादरप्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील वाॅरंट तामील करण्यासाठी रेणापूर ठाण्याचे पोलिस त्याच्या दारावर साेमवारी पहाटे ३ वाजता धडकले. यावेळी एवढ्या पहाटे तुम्ही दारात आले, आम्ही काय खुनातील आराेपी आहाेत का? म्हणून पोलिस आणि कुटुंबीयांत बाचाबाची झाली अन् कुटुंबातील एका महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, वाॅरंट बजावण्यासाठी पहाटेच्यावेळी गेलेल्या पाेलिसांविराेधात कारवाई करावी, अशी मागणी संतप्त कुटुंबीयांनी केली असून, लातुरातील शासकीय रुग्णालयात साेमवारी सकाळी काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते.
पाेलिसांनी सांगितले, रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील एका व्यक्तीविराेधात कलम १३८ नुसार न्यायालयात खटला सुरू आहे. न्यायालयाने वाॅरंट बजावण्याचे आदेश दिले हाेते. पहाटेच्यावेळी रेणापूर पोलिस त्या व्यक्तीच्या दारावर धडकले. यावेळी त्या कुटुंबातील महिला समाेर आल्या. पोलिस आणि कुटुंबात बाचाबाची झाली. दरम्यान, यावेळी कुटुंबातील एका महिलेला अचानक त्रास सुरू झाला, त्या जमिनीवर काेसळल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले. पहाटेच्यावेळी वाॅरंट बजावण्यासाठी पोलिस आले आणि कुटुंब-पाेलिसामध्ये वाद झाला. यातूनच महिलेचा मृत्यू झाला, असा आराेप कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत पाेलिसांविराेधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली. गुन्हा दाखल झाल्यानंतरच मृतदेहाची उत्तरीय तपासणी करावी, असा पवित्रा घेतला. पाेलिसांनी समजूत काढल्यानंतर मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.
लातुरात शासकीय रुग्णालयात तणाव...
मयत महिलेची उत्तरीय तपासणी करण्यापूर्वी संबंधित पाेलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली हाेती. यातून लातूर येथील शासकीय सर्वाेपचार रुग्णालयात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते.
शवविच्छेदन अहवालानंतर हाेणार पाेलिसांवर कारवाई...
महिलेच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवालानंतर संबंधित पाेलिसांवर कारवाई केली जाणार आहे. कुटुंबीयांनी पाेलिसांवरच आराेप केले आहेत. याबाबतची चाैकशी केली जाईल. नेमके काय झाले आहे, याचाही तपास केला जाणार आहे. - डी.डी. शिंदे, पोलिस निरीक्षक, रेणापूर