लातूर : शिक्षणातील ‘लातूर पॅटर्न’ हा देशभर प्रसिद्ध असून, त्याच धर्तीवर आता आराेग्य क्षेत्रातील सेवेतही ‘लातूर पॅटर्न’ निर्माण झाला आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ही आपली संस्कृती आहे. त्याच मार्गावर विवेकानंद रुग्णालय आणि पद्मभूषण डाॅ़ अशाेक कुकडे यांनी पथदर्शी काम उभे केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
विवेकानंद रुग्णसेवा सदनाचे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी लाेकार्पण झाले. मंचावर डाॅ. अनंत पंढरे, बी.बी. ठाेंबरे, डाॅ. अशाेक कुकडे, डाॅ़ अरुणा देवधर यांची उपस्थिती हाेती. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, समाजातील शाेषित-पीडित, दीन-दलित, वंचित घटकांच्या कल्याणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्या अवतीभवतीच्या दु:खाबाबत आपण संवेदनशील असले पाहिजे, असेही ते म्हणाले. डाॅ़ अशाेक कुकडे यांनी प्रास्ताविक केले. डाॅ. अनंत पंढरे यांनी विवेकानंद रुग्णालयाचा वासरसा घेवूनच आम्ही औरंगाबाद येथे डाॅ़ हेडगेवार रुग्णालयाची उभारणी केल्याचे सांगितले. यावेळी कमलाक्षी कुलकर्णी हिने गीत सादर केले. याप्रसंगी विवेकानंद रुग्णसेवा सदनासाठी आर्थिक मदत करणारे डाॅ. अरुणा देवधर, विशाल सिरया, नारायण काेचक, गिरीश पाटील, खा. सुधाकर शृंगारे, प्राचार्य विभाकर मिरजकर, प्राचार्य मीरा मिरजकर, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, अभय देशमुख, डाॅ. कैलाश शर्मा तसेच डागा परिवाराचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन कुमाेदिनी भार्गव यांनी केले.
चांगले काम करा, कटाउटची गरज नाही...
चांगले काम केले तर शहरभर कटाउट, बॅनर लावण्याची गरज नाही, असे सांगत नितीन गडकरी म्हणाले, चांगले काम करणाऱ्यांना आवश्यक ताे सन्मान मिळत नाही. वाईट काम करणाऱ्यांना तितकी शिक्षा मिळत नाही, ही शाेकांतिका आहे. परंतु, समाजाने चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी रहावे. मला एक्सप्रेस हायवे, ५५ उड्डाणपुले बांधून जितका आनंद झाला त्यापेक्षा कितीतरी आनंद मुंबईत कॅन्सरग्रस्त मुलांसाठी सुसज्ज इमारत उपलब्ध करुन झाला.
कॅन्सर हाेणारच नाही असे करा...
कॅन्सरवर उपचार करावे लागतील, परंतु कॅन्सरच हाेणार नाही यासाठी काम कारण्याची गरज आहे. बी.बी. ठाेंबरे प्रयाेगशील आहेत. त्यांनी एखादा तंबाखू नसलेला पान मसाला तयार करावा, असे विनाेदाने परंतु वस्तूस्थिती सांगत नितीन गडकरी यांनी कॅन्सरवर प्रतिबंधात्मक काम आणि उपाय हाेणे गरजेचे असल्याचे सांगितले.