राजकुमार जाेंधळे, लातूर: गेले काही महिने अशांतता पसरलेल्या मणिपूरमध्ये जाऊन लातूरच्या विनायकराव पाटील कवठेकर यांनी रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी आदिवासी कुकी महिलांनी राखी बांधत बंधूभाव जपला. यावेळी शांतता, साेहार्द कायम राहावे, ही भावना सर्वांनीच व्यक्त केली.
कुकी आणि मैतई या दाेन समाजामध्ये संघर्ष निर्माण हाेऊन अशांतता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत आदिवासी कुकी समाज स्थलांतरित झाला आहे. अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत मनाेबल वाढविण्यासाठी देशाच्या काेनाकाेपऱ्यातील विविध संस्था, संघटना मणिपूरला भेट देत आहेत. त्याचाच भाग म्हणून शेतकरी नेते विनायकराव पाटील कवठेकर, अनंत अल्लासे यांनी मणिपूरच्या विविध भागांचा दाैरा केला. तेथील अन्यायग्रस्त समाजबांधवांची भेट घेतली. तसेच रक्षाबंधनाचा सण साजरा करत आदिवासी कुकी महिलांकडून राखी बांधून घेतली.
उमरगा येथील श्रमजीवी परिवाराच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे विनायकराव पाटील यांनी सांगितले. अजूनही त्या भागात महिला- मुलींची उपासमार हाेऊ नये म्हणून, काम करण्याची, तसेच दानशुरांनी मदत करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी बुधवारी सांगितले.