- हरी मोकाशेनिलंगा (जि. लातूर) - भारतीय संस्कृतीत धोंडे जेवणास अनन्य महत्त्व आहे. या कार्यक्रमासाठी येताना मी तर जावई नाही ना असा मिश्कील सवाल करीत लातूरच्या राजकारणात देशमुख विरुद्ध निलंगेकर असे समीकरण मानले जाते. मात्र, आमच्यात कसलाच वाद नसून आम्हाला निलंग्यातील खालचा वाडा व वरची टॉकीज एवढेच माहीत आहे, असे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. दरम्यान, आगामी उमेदवारीवरून जोरदार चर्चा रंगली.
येथील वृंदावन मंगल कार्यालयात शुक्रवारी आयोजित निलंगा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व राजकीय धोंडे जेवण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, आबासाहेब पाटील उजेडकर, अजित बेळकुणे, मल्लिकार्जुन मानकरी, ट्वेंटीवन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, डॉ. अरविंद भातांब्रे, अजित माने, भगवानराव पाटील, विजय नगरकर, हमीद शेख, चक्रधर शेळके, पंकज शेळके, सुधाकर पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, लाला पटेल, अमित मानकरी, सचिन दाताळ, रामभाऊ भंडारे आदी उपस्थित होते.
लातूरचा नवरदेव मुंबईत, तर निलंग्याचा दिल्लीत...माजी मंत्री आ. अमित देशमुख म्हणाले, आगामी विधानसभेसाठी लातूरचा नवरदेव मुंबईत ठरतो, तर निलंग्याचा दिल्लीत ठरतो. त्यामुळे लातूरपेक्षा निलंगा लय भारी असे म्हणताच हास्यकल्लोळ उडाला. दरम्यान, विद्यमान सरकार शेतकरी, सामान्यांच्या प्रश्नांपासून दूर आहे, असेही ते म्हणाले.
तुम्ही महाराष्ट्र सांभाळा, आम्ही लातूर सांभाळतो...अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले, काँग्रेसला काँग्रेसच पाडू शकते. इतर कोणत्याही पक्षात ती ताकत नाही. त्यामुळे अमितराव तुम्ही महाराष्ट्र सांभाळा. मी व धीरज लातूर सांभाळतो, असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
चार अ मध्ये बिघाडी झाली तर पाचवा अ...निलंगा मतदारसंघाचे काँग्रेसचे भावी उमेदवार म्हणून गणले जाणारे अशोकराव पाटील निलंगेकर, अभय साळुंके, डॉ. अरविंद भातांब्रे, अजित माने हे चार जण अ पासून सुरुवात होणाऱ्या नावाचे आहेत. त्यात जर बिघाडी झाली तर शिवसेनेचे अविनाश रेशमे महाविकास आघाडीचे अ पासूनचे पाचवे तयारच आहे, असे माजी मंत्री आ. देशमुख म्हणताच पुन्हा हास्याचे कारंजे उडाले. दरम्यान, प्रेक्षकांतून अमित राव आपले नावही अ पासून आहे, असे शब्द कानावर येताच तेही दिलखुलास हसले.