हरी मोकाशे, लातूर :नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातांना खा. हेमंत पाटील यांनी आपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ बुधवारी सायंकाळी शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मार्डच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली. महात्मा गांधी चौकात निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशन, डॉ. आंबेडकर वैद्यकीय विद्यार्थी संघटना, स्टुडंट कौन्सिल सहभागी झाले होते. यावेळी डॉ. शैलेंद्र चव्हाण, डॉ. अजय ओव्हाळ, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल राठी, सचिव डॉ. आशिष चेपुरे, वैद्यकी अधीक्षक डॉ. सचिव जाधव, डॉ. गणेश बंदखडके, डॉ. उमेश लाड, डॉ. विमल होळंबे, डॉ. निलिमा देशपांडे, मार्डचे डॉ. स्वप्नील कदम, डॉ. अविनाश दहिफळे, डॉ. अजय हमंद आदी सहभागी झाले होते.
कायदेशीर कारवाई करावी...
सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलपासून ते महात्मा गांधी चौकापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधी चौकात निदर्शने करण्यात आली. वैद्यकीय अधिष्ठातांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा आणखीन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. तत्पूर्वी अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांना निवेदन देण्यात आले.