- राजकुमार जाेंधळेलातूर - शहरातील काेल्हेनगर येथे सुरु असलेल्या जुगारावर विशेष पाेलिस पथकाने शुक्रवारी छापा मारला. यावेळी ११ जुगाऱ्यासह २ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील काेल्हे नगर भागात काही जण तिर्रट जुगार खेळत असल्याची माहिती खबऱ्याने चाकूर येथील सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांना मिळाली. या माहितीची खातरजमा करुन, विशेष पाेलिस पथकाने लातुरातील काेल्हे नगरमधील देशमुख नामक व्यक्तीच्या घरावर अचानकपणे छापा मारला. यावेळी ११ जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, राेख रक्कम असा २ लाख ७५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत लातूर शहरातील गांधी चाैक पाेलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशावरून अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली चाकूर येथील सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या पथकाने केली आहे.