- राजकुमार जाेंधळे लातूर - महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि कर्नाटक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एकाचवेळी काेराळवाडी, काेराळी (ता. निलंगा) येथील हातभट्टी अड्ड्यांवर धाड टाकली. यावेळी दाेन्ही राज्यांच्या पथकांनी शुक्रवारी सकाळी २ लाख ७२ हजारांचा अवैध दारू साठा जप्त केला असून, एकाला अटक केली आहे. याबाबत कासार शिरसी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचे पाेलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके अवैध दारूची वाहतूक, विक्री आणि हातभट्टी निर्मिती अड्ड्यांविरोधात सक्रिय झाले असून, संयुक्तपणे धाडी टाकल्या जात आहेत. लातूर येथील उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कर्नाटक राज्यातून चाेरट्या मार्गाने येणाऱ्या अवैध दारूवर कारवाई केली जात आहे. उदगीर विभागाचे पथक, कर्नाटक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक आणि कासार शिरसी पाेलिसांनी निलंगा तालुक्यातील काेराळवाडी, कोराळी येथे सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यांवर एकाचवेळी धाड टाकली. यावेळी ३५० लिटर हातभट्टी, ६ हजार १०० लिटर दारू निर्मितीसाठी लागणारे रसायन आणि दारू साठविण्यासाठी ठेवण्यात आलेले ५०० लिटरचे ११ आणि २०० लिटर क्षमतेचे ३ ड्रम, असा एकूण २ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त करून ताे नष्ट केला आहे.
ही कारवाई निरीक्षक आर. एम. चाटे, भरारी पथक निरीक्षक टी. एस. कदम, दुय्यम निरीक्षक एन. पी. राेटे, दुय्यम निरीक्षक मोनिका पाटील, रेणुका सलगर, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, जवान कलमले, गवंडी, चांदणे, एस. जी. बागेलवाड, संताेष केंद्रे, विक्रम परळीकर यांच्यासह कर्नाटक राज्य उत्पादन शुल्कचे उपाधीक्षक रवी मुरगडे, बिदरचे निरीक्षक गाेपाळ पंडित, शब्बीर बिरादार, रविकुमार पाटील, दुय्यम निरीक्षक सादिक पाशा यांच्यासह कासारशिरसी ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस. सी. भुजबळ, पाेकाॅ घाेरपडे, शिरसाट, लवटे, नागमाेडे, सोनटक्के यांच्या पथकाने केली आहे.