- आशपाक पठाण
लातूर : प्रादेशिक परिहवन विभागाने सर्वच सेवा ऑनलाईन केल्या आहेत़ गेल्या काही वर्षांपासून वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र असो की वाहन परवाना अशी बहुतांश कागदपत्रे घरपोच दिली जात आहेत़ मात्र, या घरपोच सेवेमुळे हजारो वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे़ शिवाय, सर्वच वाहनांचे आरसी बुक (वाहनांचे नोंदणी पत्र) सहा सहा महिने मिळत नसल्याची ओरड आहे़ वर्षभरात ७०० जणांचे पत्र परत आली आहेत़
वाहनांची नोंदणी केल्यावर किमान आठ ते दहा दिवसांत संबंधित मालकांना नोंदणी प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित आहे़ शासनाने वाहन परवाना, वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र घरपोच देण्याची योजना सुरू करून संबंधितांचे कार्यालयातील खेटे कमी करण्याचा प्रयत्न केला़ मात्र, मागील वर्षभरापासून घरपोच सेवेचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ नागरिकांना घरपोच कागदपत्रे देण्यासाठी ५० रुपए शुल्क घेतला जातो़ लायसन्स किंवा आरसी बुक तयार झाल्यावर आरटीओ कार्यालयातून पोस्टाकडे पाठविले जाते़ तद्नंतर त्याचा प्रवास सुरू झाला की जवळपास ८० ते ९० किलोमीटरच्या वर्तुळात संबंधित मालकाच्या घरी कागदपत्रे जायला चार चार महिने लागत आहेत़ वाहन परवान्याचा प्रवासही दोन महिन्यांपेक्षा कमी होत नसल्याने अनेकांना घरपोच सेवेचा मनस्ताप सहन करावा लागत आहे़ दुचाकी, आॅटोरिक्षा, कार, अन्य व्यावसायिक वाहनधारकांना वेळेत कागदपत्रे मिळत नसल्याने व्यवसायात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे वाहनधारकांनी सांगितले़ आरटीओ कार्यालय परिसरात ड्रायव्हिंग स्कुल चालकांसोबतही वादाच्या घटना नेहमीच होत आहेत़ त्यामुळे घरपोच सेवेपेक्षा जुनीच पध्दत बरी होती, अशी म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे़
हाय सेक्युरिटी ‘प्लेट’मुळे डोकेदुखी़नवीन वाहनांची नोंदणी झाल्यावर सदरील वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बसविल्या जात आहेत़ यासाठी वाहन खरेदी करतानाच त्या प्लेटचे पैसे डिलरकडून भरून घेतले जातात़ मात्र, एकदा वाहनांची पासिंग झाली की वाहन मालकांना आरसी बुकसाठी आरटीओ कार्यालय तर नंबर प्लेटसाठी डिलरच्या दारात खेटे मारावे लागतात़ यातून नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ याकडे कारवाई करणार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे़
नंबरप्लेट घेतल्यावर होते नोंदणीहाय सेक्युरिटी नंबरप्लेटमुळे वेळ लागत आहे़ वाहनांची पासिंग झाली की नंबर दिला जातो़ जोपर्यंत संबंधित वाहनमालक नंबरप्लेट घेऊन जाणार नाही, तोपर्यंत आॅनलाईन नोंद पूर्ण होत नाही़ आमच्याकडे आरसी बुक तयार करून पोस्टाने पाठविले जातात़ शहरी भागातील वाहनधारकांना ते लवकर मिळतात़ मात्र, ग्रामीण भागात पोस्टामुळे वेळ जातो़ घरचा पत्ता व्यवस्थित नसल्याने ज्यांचे आरसीबुक, लायसन्स परत आले त्यांना ५० रुपए शुल्क भरून घेऊन कार्यालयात हातात दिले आहेत, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले़