- आशपाक पठाणअहमदपूर - तालुक्यातील सुनेगाव (शेंद्री) या गावाला जाणारा रस्ता व मन्याड नदीवरील पूल गुरूवारी पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना अहमदपूरला जाण्यासाठी पर्यायी मार्गाने जवळपास १५ किलोमीटर दूरवरून जावे लागत असल्याने अडचण निर्माण झाली आहे. मागील आठ दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने मन्याड नदीला पूर आला आहे.
मन्याड नदीवरील या पुलाची उंची अत्यंत कमी असल्यामुळे आणि पुल्याच्या दोन्ही बाजुंना रस्त्याचा आधार नसल्यामुळे सन २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे सदरील पुल वाहून गेला होता. या संदर्भात ग्रामस्थांनी सन २०१७ मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीवर पुलाचे काम व पक्क्या रस्त्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला. तद्नंतर प्रशासनाने गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून पुलाच्या दोन्ही बाजूस कच्चा रस्ता तयार केला. परंतू प्रत्येक पावसाळ्यात नदीला पूर आला की पुलाच्या बाजुचा रस्ता वाहुन जात आहे. या त्रासाला कंटाळून पुन्हा एकदा सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला. तेव्हापासून आजपासून शासनाकडून दुरूस्तीच झाली नाही, ग्रामस्थ दरवर्षी वर्गणी करून वाहतुकीचा प्रश्न सोडवित असल्याचे ग्रामस्थ गोविंद काळे यांनी सांगितले.
पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षीच त्राससंततधार पावसामुळे मन्याड नदीला पुर आला असून गुरूवारी तालुक्याशी गावाला जोडणारा रस्ता तसेच उंची कमी असलेला पुल पाण्याखाली गेला. त्यामुळे ग्रामस्थांचा अहमदपूरशी संपर्क तुटला आहे. आता अहमदपूरला जायचे म्हटल्यावर जवळपास १५ किलोमीटर दूरवरून जावे लागणार आहे. पूल, रस्त्याच्या कामासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने दिली, आंदोलनही केले पण पुलाचे काम झाले नाही. दरवर्षी लोकवर्गणीतून दुरूस्ती करून आम्ही सोय करतो. आता तरी प्रशासनाने तत्काळ रस्ता व पुलाचे काम करावे अशी मागणी सरपंच उषा गोपीनाथ जायभाये यांच्यासह ग्रामस्थांनी केली.