- हरी मोकाशे
लातूर - प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तक्रारदाराच्या नावाने करुन देण्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची लाच घेताना एका तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. विशेष म्हणजे, लाच घेताना हा तलाठी दुसऱ्यांदा सापडला आहे.
केरबा गोविंद शिंदे असे लाच घेणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे. तलाठी केरबा शिंदे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभागात कार्यरत आहेत. तक्रारदाराच्या चुलत बहिणीच्या नावावर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आहे. ते आजीच्या शपथपत्राच्या आधारे तक्रारदाराच्या नावाने करुन देण्यासाठी तलाठी शिंदे याने पंचासमक्ष तक्रारदारास सुरुवातीस ५ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती २ हजार रुपये देण्याचे ठरले. काही वेळानंतर तक्रारदार हे तलाठ्यास लाचेचे दोन हजार रुपये देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभागात गेले. तेव्हा तलाठ्याने ही रक्कम स्विकारली. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून लाचेच्या रकमेसह तलाठ्यास पकडले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भास्कर पुल्ली यांच्या पथकाने केली.