- राजकुमार जाेंधळे लातूर - उदगीर तालुक्यातील देवर्जन परिसरातील हत्तीबेट येथील वनविभागाच्या विहिरीत शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी लातूरसह तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील पोलिसांना मयत व्यक्तीचे फोटो पाठविले. अवघ्या चार तासात मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले. हा मृतदेह तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील असून, बहिण आणि भाचाने मालमत्तेच्या वादातून हा खून केल्याचे समाेर आले. व्यंकटेश मलय्या मलपुरी (वय ५८, रा. कुसनूर ता. कल्लेर जि. संगारेड्डी, तेलंगाणा) असे मयताचे नाव आहे.
पाेलिसांनी सांगितले, देवर्जन येथील हत्तीबेट परीसरात शनिवारी सकाळी १० वाजता वनविभागाच्या विहिरीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली. महाराष्ट्र आणि सीमाभागातील पोलिसांची गुन्ह्याच्या अनुषंगाने बैठका होत असतात. हत्तीबेटावरील विहिरीत आढळलेल्या मृतदेह छायाचित्र कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश पोलिसांना पाठविण्यात आले. शनिवारी सायंकाळी तेलंगाणातील संगारेड्डी येथील पोलिसांनी उदगीर पोलिसांशी संपर्क साधत तो मृतदेह त्यांच्या हद्दीतील असल्याचे सांगितले. संगारेड्डी येथून मयत व्यक्तीचे अपहरण झाले असून, संगारेड्डी ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. मयताचे नातेवाईक आणि तेलंगाना पोलिस शनिवारी सायंकाळी उदगीरात दाखल झाले असून, शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेतला आहे.
प्राॅपर्टीच्या वादातूनच अभियंता असलेल्या भाचाने काढला काटा...व्यंकटेश मलय्या मलपुरी याचे गुरुवारी अपहरण केले. व्यंकटेश मलपुरी यांचे त्याचा अभियंता असलेला भाचा नरेंद्र मलय्या परशेट्टी (३०, रा. लाडेगाव ता. जुक्कल, तेलंगणा) यांच्यासह अन्य चाैघांनी गुरुवारी मालमत्तेच्या वादातून अपहरण केले होते. दरम्यान, व्यंकटेशचा गळा आवळून आणि डोक्यात मारून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी गुरुवारी रात्री देवर्जन येथील हत्तीबेट परिसरातील वन विभागाच्या विहिरीत मृतदेह टाकला होता. आरोपींमध्ये देगलूरच्या दोघांचा समावेश असल्याचे समाेर आले. बहिण आणि भाचाने प्रॉपर्टीच्या वादातून हा खून केल्याचे उघड झाले. संगारेड्डी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.- अरविंद पवार, पोलिस निरीक्षक, उदगीर