- राजकुमार जाेंधळे
औसा (जि. लातूर) : कर्नाटकातून महाराष्ट्रात चाेरट्या मार्गाने गुटख्याची टेम्पाेतून वाहतूक करणाऱ्या दाेघांच्या मुसक्या औसा पाेलिसांनी आवळल्या. ही कारवाई परभणी-जहिराबाद महामार्गावरील लाेदगा येथे बुधवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास केली. पाेलिसांनी टेम्पाेसह गुटखा असा ३३ लाख २१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
कर्नाटकातून चोरट्या मार्गाने विविध प्रकारच्या गुटख्याची वाहतूक करुन ताे विक्री केला जात आहे. यातून लाखाे रुपयांचा नफा मिळविण्यासाठी कर्नाटकातून लातुरात टेम्पाेतून गुटखा आणला जात असल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीची खातरजमा करुन औसा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांनी परभणी-जहिराबाद महामार्गावरील लोदगा येथे सापळा लावला. येथील कलाकेंद्र परिसरात टेम्पो (एम.एच. २४ जे ९५६२) थांबवून गुटखा पकडला. टेम्पाेमध्ये विविध कंपन्यांचा गुटखा (किंमत २९ लाख ७१ हजार) आणि टेम्पो (किंमत ३ लाख ५० हजार) असा एकूण ३३ लाख २१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यावेळी रामस्वरुप रामकरण शर्मा (३२ रा. राज्यस्थान), वागंभर गुंडेराव शेळके (२५, रा. सुगाव, ता. चाकूर) यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ही कारवाई पाेलिस निरीक्षक सुनील रजितवाड, लक्ष्मण बारसले, दत्तात्रय गोबाडे, अनंत शिंदे, संतोष चव्हाण, नितीन सगर, सुरेश पवार यांच्या पथकाने केली.