लातूर : औसा तालुक्यातील हिप्परगा येथील एकाच्या खूनप्रकरणी दाेषी ठरलेल्या तिघांना लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश - १ आर.बी. राेटे यांनी शुक्रवारी प्रत्येकी एक हजाराच्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सरकारी वकील विठ्ठल देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जून, २०१८ राेजी फिर्यादी बालाजी आंबेकर व त्यांचे वडील मयत गणू आंबेकर हे पेरणीसाठी शेतात गेले हाेते. दरम्यान, दिवसभर पेरणी करून ते सायंकाळच्या सुमारास बैलगाडीतून परत निघाले हाेते. यावेळी सुधाकर बंकट आंबेकर, शिवाजी उर्फ शिवशंकर बंकट आंबेकर आणि बाळासाहेब बंक आंबेकर यांनी शेतीच्या कारणावरून कुरापत काढून फिर्यादीच्या वडिलांस सुधाकर आंबेकर यांनी कुऱ्हाडीने मारून गंभीर जखमी केले. त्याचबराेबर, बाळासाहेब आंबेकर याने काठीने मारले, तर शिवशंकर आंबेकर याने लाेखंडी सळईने मारले, सळई बरगडीमध्ये खुपसली. गंभीर जखमी गणू आंबेकर यांना ऑटाेतून औसा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर, लातुरात शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डाॅक्टरांनी मृत घाेषित केले. याबाबत मुलगा बालाजी गणू आंबेकर यांच्या फिर्यादीवरून भादा पाेलिस ठाण्यात कलम ३०२, ३२६, ३२४, ३२३, ५०४, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला. पाेलिस निरीक्षक एस.डी. पवार यांनी तपास करून न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले.
११ जणांनी साक्ष ठरली महत्त्वपूर्ण...
खटल्याच्या सुनावणीच्या दरम्यान न्यायालयात ११ साक्षीदारांची साक्ष नाेंदविण्यात आली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष, डाॅक्टरांचा पुरावा ग्राह्य धरून लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश - १ आर.बी. राेटे यांनी सुधाकर बंकट आंबेकर, शिवाजी उर्फ शिवशंकर बंकट आंबेकर आणि बाळासाहेब बंकट आंबेकर (तिघेही रा.हिप्परगा ता.औसा) यांना दाेषी ठरवत, कलम ३०२ सहकलम ३४ अन्वये जन्मठेप आणि प्रत्येकी एक हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने विठ्ठल देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड.परमेश्वर कल्लेवाड, ॲड.वैशाली वीरकर-सूर्यवंशी, पैरवी अधिकारी, महिला पाेलिस एस.आर. काेरे यांनी सहकार्य केले.