लातूर : रेल्वे विभागाने लातूर येथून सुरु केलेल्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांची सध्याला पळवापळवी सुरु झाली आहे. लातूर येथून तिरुपतीसाठी सुरु करण्यात आलेली रेल्वे उदगीर, बीदर, हुमनाबाद, गुलबर्गा मार्गावरुन नियाेजितपणे धावणार हाेती. मात्र, ती रेल्वेगाडी लातूरऐवजी आता जालना ते तिरुपती अशी धावणार आहे, ही रेल्वेगाडी जालन्याने पळविली आहे. अशी माहिती मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली.
रेल्वे विभागाच्या वतीने सुरु केलेली नांदेड-हुबळी लातूर मार्गावरुन धावणारी रेल्वे आता कर्नाटक मार्गे धावणार आहे. काेल्हापूर-धनबाद नवीन वेळापत्रकानुसार सुरु करण्यात आलेली रेल्वे आता पळवून ती पुणे-मनमाड-औरंगाबाद - जालना मार्गे धावणार आहे. बुधवारी सुरु झालेली रेल्वेगाडीही पळविण्यात आली आहे. हिंगाेली येथून धावणारी हिंगाेली- छपरा एक्सप्रेस रेल्वे जालना-छपरा अशी धावणार आहे.
लातूर येथील रेल्वेच्या अनेक मागण्या आजही प्रलंबित आहेत. लातूर-मुंबई एक्सप्रेसचे डबे वाढवा, कोल्हापूर - नागपूर एक्सप्रेस दररोज सुरु करा, अमरावती - पुणे पुन्हा सुरु करा, हैद्राबाद - पुणे दररोज सुरु करा, काेराेना काळात बंद केलेल्या रेल्वे पुन्हा सुरु करा, आदी विविध मागण्या मराठवाडा रेल्वे संघर्ष समिती, लातूर शाखेचे शिवाजीराव नरहरे, डाॅ. भास्कर बाेरगांवकर, डाॅ. बी.आर. पाटील, सुपर्ण जगताप यांनी केल्या आहेत.
गुलबर्गा, बाेधन मार्गाला निधी द्या...लातूर रोड लूपलाईनचे काम सुरू करावे, नांदेड - लातूर रोड, गुलबर्गा - लातूर आणि बोधन ते लातूर रोड नवीन रेल्वे मार्गाला निधी उपलब्ध करुन द्यावा, त्याचे काम सुरू करावे. लातूर रोड लूपलाईन, लातूर येथी पीटलाईनचे काम तातडीने करावेत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.