- राजकुमार जाेंधळे
लातूर - परवानगी न घेता झाड तोडल्याप्रकरणी लातूर महानगरपालिकेने शहरातील नागरिकाला एक लाखाच्या दंडाची नोटीस बजावली असून, याबाबत संबंधितांविराेधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर शहरातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये एका शाळेच्या पाठीमागील बाजूस वास्तव्याला असणारे प्रशांत विलास जाधव यांनी जवळपास ४० फूट उंच असलेले झाड शनिवारी तोडले. त्याच्या बाजूला असणारे तेवढ्याच उंचीचे झाड ते तोडण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून सुरू होता. याची माहिती मनपा प्रशासनाला मिळाली असता, आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या आदेशावरून मनपाचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले. सहायक आयुक्त मंजूषा गुरमे, क्षेत्रीय अधिकारी विजय राजुरे, स्वच्छता निरीक्षक डी. एस. सोनवणे, कनिष्ठ अभियंता वैभव स्वामी यांच्यासह मनपा उद्यान विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने संबंधित व्यक्तीला दुसरे झाड तोडण्यास मज्जाव केला. विनापरवानगी झाड तोडल्याबद्दल प्रशांत विलास जाधव यांना ४ दिवसांच्या आत एक लाख रुपये दंड भरण्याची नोटीस बजावली आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात स्वच्छता निरीक्षक डी. एस. साेनवणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
तर विनापरवाना वृक्ष ताेडल्यास हाेणार कारवाई...लातूर शहरात नागरिकांनी वृक्ष ताेडण्याबाबत मनपा प्रशासनाची रीतसर परवानगी घ्यावी, विनापरवाना वृक्षताेड केली तर त्यांच्याविराेधात कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईने विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.