- राजकुमार जाेंधळे
लातूर - घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघा अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या स्थागुशाने आवळल्या असून, सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा १५ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिसका दाखवताच आराेपींनी दरोडा, जबरी चोरी व घरफाेडीच्या १७ गुन्ह्यांची कबुली दिली.
पाेलिसांनी सांगितले, लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी, दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे माेठ्या प्रमाणावर घडले आहेत. या गुन्ह्यातील आराेपींच्या अटकेचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले. या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पो.नि. संजीवन मिरकले यांच्या पथकाने शाेध माेहीम हाती घेतली. घरफोडीतील गुन्हेगार हा चोरलेले सोन्याचे दागिने विक्रीसाठी अहमदपूर ते टेंभुर्णी रोडवर एका पुलाखाली येणार आहे, अशी माहिती बखऱ्याने दिली. दरम्यान, अहमदपूर येथे स्थागुशाचे पथक रवाना झाले. अहमदपूर ते टेंभुर्णी जाणाऱ्या मार्गावर पथकाने सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. चाैकशीत त्याने भारत गोविंद शिंदे उर्फ अशोक समिंदर शिंदे (वय ४५, रा. बोरी, ता. जिंतूर, जि. परभणी, ह.मु. मळाई पार्क, फुरसुंगी, हडपसर जिल्हा पुणे) आणि अविनाश किशन भोसले (वय २३, नायगाववाडी, ता. नायगाव, जि. नांदेड) असे नाव सांगितले. त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता, त्यात सोन्या-चांदीचे दागिने आढळून आले. याबाबत चाैकशी केली असता, त्याच्या इतर साथीदारांसाेबत लातूर जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी, दरोडा, जबरी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या वाट्याला आलेला हा मुद्देमाल असल्याचे सांगितले.
ही कारवाई स्थागुशाचे पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, अंमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे, राजेश कंचे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, प्रदीप स्वामी, जमीर शेख, संतोष खांडेकर, नकुल पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार पुणेकर, धनंजय गुट्टे, सुहास जाधव, संतोष देवडे, गणेश साठे, शैलेश सुडे यांच्या पथकाने केली आहे.
विविध गुन्ह्यांची कबुली; त्या टाेळीकडून घरफाेड्या...
अटकेतील दाेघा आराेपींनी दिलेल्या कबुलीत अहमदपूर ठाण्याच्या हद्दीत ४ गुन्हे, वाढवणा ठाणे ४ गुन्हे, चाकूर ठाण्याच्या हद्दीत ५ गुन्हे, किनगाव, उदगीर ग्रामीण, लातूर ग्रामीण आणि रेणापूर ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक गुन्हा असे एकूण १७ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.