- आशपाक पठाण लातूर - येथील बंद पडलेला शासकीय दूध भुकटी प्रकल्प पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी पुनरुज्जीवन समिती सक्रिय झाली असून, या समितीने उदगीरचे आमदार व क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे व खासदार सुधाकर शृंगारे यांच्या नेतृत्वाखाली दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबई येथे शनिवारी भेट घेवून साकडे घातले. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा प्रकल्प सुरू करण्यासाठी दिल्ली दरबारातील एन.डी.डी.बी. कडे प्रस्ताव पाठविण्यात यावा असे निर्देश दुग्धविकास सचिवांना दिले.
उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्प पूर्ववत सुरू करण्यासाठी दूध डेअरीसमोर उदगीरकरांची एक व्यापक बैठक झाली. तद्नंतर मंत्री संजय बनसोडे यांना दुग्धविकास मंत्र्याला सदर प्रकल्प चालू करण्याच्या संबंधात निवेदन देण्यात आले.
७ ऑगस्टला शासनाकडे सकारात्मक पाठपुरावा करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली. १३ ऑगस्टला समितीने शिवाजी महाविद्यालयात मंत्री संजय बनसोडे यांच्याशी सार्वजनिक चर्चा करून आपले निवेदन दिले. १८ऑगस्ट रोजी मुंबई दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मंत्रालयात भेट घेऊन आपले निवेदन दिले. मंत्री संजय बनसोडे यांनी सदर प्रकल्पाला लागेल तितका निधी उपलब्ध करून देण्याची भूमिका घेतली. महानंद च्या संदर्भात महाराष्ट्र शासन एनडीडीबीकडे प्रस्ताव पाठवत आहे. त्याच धर्तीवर उदगीरच्या शासकीय दूध योजनेचा प्रस्ताव दिल्ली येथे पाठविण्यासंदर्भात दुग्धविकास सचिवांना निर्देश दिले. खा. सुधाकर शृंगारे यांनी या संदर्भात केंद्रीय दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे आपण पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही शिष्टमंडळास दिली.
हा प्रकल्प अशासकीय व्यवस्थेकडे जाऊ देणार नसल्याची ग्वाही विखे पाटील यांनी दिली. या समितीत आशिष पाटील राजूरकर, एस.एस .पाटील, नरेश सोनवणे, अजित शिंदे, अहमद सरवर, संतोष कुलकर्णी, शिवकुमार जाधव, मोतीलाल डोईजोडे, विनोद मिंचे, ओमकार गांजुरे, कपिल शेटकर व चंद्रकांत टेंगेटोल यांचा समावेश होता.