ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 15 - उन्हाचा कडाका सुरू झालेल्या लातूरला बुधवारी मुसळधार पावसाने झोडपले. सकाळी 10.30 आणि दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास आलेल्या पावसाच्या सरींमुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट होते. मात्र गेल्या वर्षी दुष्काळग्रस्त लातूरवर मेहरबान झालेल्या पावसाने सरासरीपेक्षाही जास्त हजेरी लावली. आता उन्हाळ्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दुपारी जवळपास अर्धा तास पाऊस पडल्याने परिसरात गारवा निर्माण झाला होता.
पाऊस शेतीला घातक
आताचा पाऊस अवकाळी असल्याने शेतीला घातक असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील अनेक शेतक-यांच्या शेतात ज्वारी आणि हरभ-याच्या राशी पडलेल्या आहेत. अवकाळी पावसामुळे आंबे, द्राक्ष पिकांचे नुकसान होणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.