लातूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने जिल्ह्यात अमृत सरोवर योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ३८ सरोवरांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे जलसाठ्यात वाढ होण्याबरोबर जमिनीत पाणी मुरण्यास मदत होणार आहे.
केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी ७५ जलाशये निर्माण करणे अथवा पुनर्जिवित करण्याचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाचे अमृत सरोवर योजना असे संबोधले जाते. प्रत्येक सरोवर हे किमान एक एकर आकारमानाचे व किमान १० हजार क्युबिक जलसाठ्याचे आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ९३ अमृत सरोवरांची निर्मिती अथवा पुनर्जिवित करण्याचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, मृद व जलसंधारण विभागामार्फत ३८ अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत मनरेगामधून १० अमृत सरोवरांची निर्मिती सुरु आहे. या उपक्रमामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ३८ पैकी १५ आणि निर्माण होत असलेल्या १० अमृत सरोवर स्थळी १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.