उदगीर (जि. लातूर) : शहराचे उपनगर असलेल्या दत्तनगर मादलापूर येथील एका २९ वर्षीय महिलेचा मृतदेह बनशेळकी येथील तलावात दुपारी ४ वाजता आढळून आला आहे. ही महिला मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दोन मुलांना सोबत घेऊन आधार कार्ड काढायचे आहे, असे सांगून घराबाहेर पडली होती. सोबतच्या मुलांचा अद्याप शोध लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, मादलापूर येथील दत्तनगर भागात राहणारी महिला मनीषा गौतम शिरसाट (२९) ही मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुलांचे आधार कार्ड काढायचे आहे, म्हणून घरी सांगून सोबत ३ वर्षांची मुलगी व ९ वर्षांचा मुलगा यांना घेऊन घराबाहेर पडली. दुपारपर्यंत ती घरी न आल्यामुळे नातेवाइकांनी आजूबाजूला शोध घेऊन तिचा तपास काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, उदगीर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बनशेळकी तलावात एका अज्ञात महिलेचे शव तरंगत असल्याची माहिती तिच्या नातेवाइकाला मिळाली.
दरम्यान, ही घटना ग्रामीण पोलिसांना माहिती होताच ग्रामीण पोलिस स्टेशनचे पथक व उदगीर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन सदरील महिलेचे शव पाण्याबाहेर काढले असता तिची ओळख पटली. त्या महिलेसोबत तिची दोन्ही मुले घराबाहेर पडल्याने त्या मुलांचा शोध घेत असल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले. सदरील महिलेचा विवाह शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कारेवाडी येथील गौतम शिरसाठ यांच्या सोबत झाला होता. कामानिमित्त ते मुंबई येथे गेले होते. तेथेच तिच्या पतीचे दोन-तीन महिन्यांच्या पूर्वी निधन झाल्यामुळे ती चिंतेत होती. सध्या ती माहेरी मादलापूर येथेच राहत होती, अशी माहिती नातेवाइकांनी पोलिसांना दिली.
पतीच्या निधनानंतर होती चिंतेत...महिलेचे पती गौतम सिरसाठ यांचे जवळपास तीन महिन्यांपूर्वी कामानिमित्त मुंबईला गेल्यावर निधन झाले होते. तेव्हापासून पत्नी मनीषा चिंताग्रस्त होती. पतीच्या निधनानंतर माहेरी मादलापूर येथेच राहत होती. सोबत तीन वर्षांची मुलगी आणि ९ वर्षांचा एक मुलगाही होता. मंगळवारी सकाळी दोन्ही मुलांना सोबत घेऊन गेलेल्या महिलेचे शव तलावात आढळले आहे. आता दोन मुलांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.