औराद शहाजानी :लातूर-जहिराबाद राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम झाले असून, काम पूर्ण होण्याआधीच खड्डे पडले असून, तडे जात आहेत. त्यामुळे दुरुस्ती करावी, यासाठी काँग्रेसच्या वतीने हायवे परिक्रमा काढण्यात आली आहे. त्यास पाठिंबा देत औराद शहाजानी येथील व्यापाऱ्यांनी बंद पाळला. तर काँग्रेसच्या वतीने शनिवारी रास्ता रोको आंदाेलन करीत परिक्रमेचा समारोप करण्यात आला.
लातूर-जहिराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कामास २०१७ मध्ये सुरुवात झाली होती. हे काम आजही अर्धवट स्थितीत असून, शेळगीमोड येथील पूल बांधकाम झालेले नाही. महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, सिमेंट रस्त्याला तडे गेले आहेत. वाहनांचे अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने हायवे परिक्रमा काढण्यात आली असून, शनिवारी औराद येथे समारोप करण्यात आला.
यावेळी व्यापाऱ्यांनी परिक्रमेस पाठिंबा देत बंद पाळला. तसेच काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंखे यांनी परिक्रमेस सुरुवात केली होती. यावेळी डॉ. अरविंद भातंब्रे, अजित माने, नारायण सोमवंशी, हमिद शेख, सुधाकर पाटील, मोहनराव भंडारे, बाबुराव भंडारे, पंकज शेळके, अजित नाईकवाडे, चक्रधर शेळके, गंगाधर चव्हाण, पद्मसिंह पाटील, महेश भंडारे, बालाजी भंडारे, समयोदिन शेख, मदन बिरादार आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
रॅली काढून महामार्गावर आंदोलन...औराद शहाजनी येथील रखडलेल्या पुलाचे काम पूर्ण करावे, चांगल्या प्रतीचे काम व्हावे या मागणीसाठी पाठिंबा म्हणून बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. तसेच सकाळी रॅली काढत छत्रपती शिवाजी महाराज चौकात महामार्गावर काही काळ रस्ता रोको करण्यात आला. यानंतर अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली सभा पार पडली. दरम्यान, परिक्रमेस पाठिंबा दर्शवत औराद काँग्रेसच्या वतीने शनिवारी बाजारपेठ बंद ठेवावी अशी मागणी करणारे निवेदन प्रशासनास देण्यात आली. तर बंद करू नये अशा मागणीचे निवेदन भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिले होते.