लातूर : कानात आणि डोळ्यांत अंतर आहे. त्यामुळे कानांनी ऐकलेल्या गोष्टीपेक्षा डोळ्यांनी पाहिलेली अधिक विश्वसनीय असते, असे सर्वजण म्हणतात. मात्र, शुक्रवारी बहुतांश जणांनी डोळ्यांनी पाहिलेल्या सोशल मीडियावरील संदेशावरून एकमेकांशी संवाद साधत ते खरं आहे का? अशी जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी चर्चा करत होते. तो व्हायरल संदेश होता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदलीचा. अखेर सोशल मीडियावरील तो संदेशच बनावट असल्याचे समजल्यानंतर चर्चेस पूर्णविराम मिळाला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल हे जुलै २०२० मध्ये येथे रुजू झाले आहेत. ते आपल्या कार्यकाळात चांगले कार्य करत असून, सातत्याने विविध नवनवीन उपक्रमही राबवत आहेत. गेल्यावर्षी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने प्रशासक म्हणून कामकाज पाहात आहेत. दरम्यान, त्यांचा येथे जवळपास तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत काही दिवसांपासून आता नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काेणाची नियुक्ती होणार, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची पोस्ट व्हायरल झाली. त्यातील पहिल्या नावात बदल एडिट करत अभिनव गोयल असे करण्यात आले. ही पोस्ट पाहिल्यानंतर जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी एकमेकांशी संवाद साधत सोशल मीडियावरील तो संदेश खरा आहे का? अशी विचारणा करू लागले. जिल्हा परिषदेतील बहुतांश जणांना या संदेशाची उत्सुकता लागली होती. अखेर जिल्हा परिषदेतील विश्वसनीय अधिकाऱ्यांकडून खात्री करून घेतल्यानंतर संदेशच बनावट असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता डोळ्यांनी पाहिलं तरी ते खरं आहे हे सांगता येत नाही, अशी चर्चा करीत होते.