लातूर : मागील सहा महिन्यांपासून मराठा समाजाचा ओबीसीमधून आरक्षणासाठी लढा सुरू आहे. यासंदर्भात मंगळवारी राज्य शासनाने विशेष अधिवेशन बोलावून कोर्टात न टिकणारे अध्यादेश काढून समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करीत अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने अध्यादेशाची होळी करण्यात आली. लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना मंगळवारी राज्य शासनाने विशेष अधिवेशन बोलावले. यात सरकारच्या वतीने सगेसोयरेचा वटहुकूम न काढता स्वतंत्रपणे शिक्षण आणि नोकरीत मराठा समाजाला १० टक्के आरक्षण अध्यादेश काढले. हे अध्यादेश काेर्टात न टिकणारे आहे, शासनाने परत एकदा मराठा समाजाची फसवणूक केली असा आरोप आंदोलकांनी केला. अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य शासनाने मंगळवारी काढलेल्या या अध्यादेशाची होळी करत सरकारचा निषेध व्यक्त केला. तसेच यापुढे आणखी तीव्र आंदोलन होईल असा इशाराही देण्यात आला. यावेळी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे, भगवानदादा माकणे, दीपक नरवडे, मनोज फेसाटे, मनोज लंगर, अंकुश शेळके, शिवशंकर सूर्यवंशी, केशव पाटील, सुदर्शन ढमाले, रमाकांत करहे, श्रीधर धुमाळ, कैलास सूर्यवंशी, राहुल भोसले, ऋषी खरोसे आदींची उपस्थिती होती.