राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरातील उद्याेगभवन, सिग्नल कॅम्प आणि सूतमील राेड परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांची झाडाझडती घेतली असून, त्यांच्याविराेधात पोलिस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. विनाकारण फिरणे २४ तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. क्लाेस परिसरात पाेलिसांकडून गस्त घातली जात असून, वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, ही कारवाई करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, क्लाेस परिसर, उद्याेग भवन परिसर, सिग्नल कॅम्प आणि सूतमील राेड परिसरात पाेलिसांकडून सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास गस्त घातली जात आहे. या भागात माेठ्या प्रमाणावर पहाटेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांची वर्दळ असते. त्यांच्या सुरक्षेसाठी पाेलिसांनी आपली गस्त वाढविली आहे. शिवाय, दामिनी पथक कायम फिरत असून, ठिकठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या तरुणांची चाैकशी केली जात आहे. शिवाय, वाहनांची तपासणीही केली जात आहे. यामध्ये विनाकारण फिरणारे २४ तरुण आढळून आले आहेत. त्यांच्याविराेधात कारवाई करण्यात आली आहे.
कोम्बिंग ऑपेरशन; १५८ खटले दाखल...लातुरातील चार ठाण्यांचे पोलिस अधिकारी, १३ अंमलदार, वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी, ८ अंमलदार आणि आरसीपीचे १९ पोलिस कर्मचाऱ्यांनी एकाचवेळी उद्याेग भवन परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यामध्ये तब्बल १५८ खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यांना १ लाख १० हजार ६०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे. काेप्ता कायद्यानुसार १३ जणांविराेधात कारवाई केली आहे. त्यांना ५ हजार ९०० रुपयांचा दंड केला आहे.
फ्लेक्सचा अडथळा; महापालिकेची कारवाई...उद्याेग भवन परिसरात माेठ्या प्रमाणावर फलक, फ्लेक्स लावण्यात आले असून, याचा रहदारीला, वाहतुकीला अडथळा हाेत आहे. याविराेधात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. असे फलक, फ्लेक्स आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.