लातूर : लातूर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६९३ मि.मी. असून आतापर्यंत ७२७.०३ मि.मी. एवढा पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदासरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने लातूरकर सुखावले आहेत. जिल्ह्यातील २३ मंडळांमध्ये ६५ मि.मी. पेक्षा अधिक पाऊस म्हणजेच अतिवृष्टी झाली आहे.
लातूर शहराचा पाणी पुरवठा ज्या प्रकल्पावर आहे, त्या प्रकल्पातही उपयुक्त पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. निम्न तेरणा प्रकल्पातही ५२ दलघमी पाणी साठा झाला असून, लातूर तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्प मृत साठ्यातून जिवंत साठ्यात आला आहे. देवर्जन, साकोळ १०० टक्के भरले असून, रेणापूर, व्हटी, तिरु मध्यम प्रकल्पातही बऱ्यापैकी पाणी साठा झाला आहे. दरम्यान, आतापर्यंत लातूर तालुक्यात ६३३, औसा ७६२, अहमदपूर ७५६, निलंगा ७६७, उदगीर ७३२, चाकूर ६३७, रेणापूर ७२५, देवणी ८५५, शिरूर अनंतपाळ ६९६ तर जळकोट तालुक्यात ८४८ मि.मी. पाऊस झाला आहे.
लातूर शहरासह कळंब, केज, अंबाजोगाई, धारूर आदी शहरांना पाणी पुरवठा होणाऱ्या मांजरा प्रकल्पात ४७.१४ टक्के पाणी साठा झाला आहे. यातील ३३.०७ टक्के उपयुक्त पाणी साठा आहे. १ जूनपासून या प्रकल्पामध्ये ९८.७९२ दलघमी नव्याने पाणी साठा झाला आहे. लातूरकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
सद्यस्थितीत प्रकल्पात एकूण १०५. ६५८ दलघमी पाणी साठा झाला आहे. यातील ५८.५२८ दलघमी पाणी साठा उपयुक्त आहे.
प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता २२४.०९ दलघमी असून, उपयुक्त पाणी साठ्याची क्षमता १७६.९६ दलघमी आहे. तर मृतसाठा ४७.१३० दलघमी आहे. पूर्ण संचय पातळी ६४२.३७ मीटर आहे. सद्यस्थितीत पाणी पातळी ६३८.७५ मीटर असल्याचे शाखा अभियंता शाहुराज पाटील यांनी सांगितले.