लातूर : शहरातील प्रमुख मार्गासह बाजारपेठ, अंतर्गत रस्ते आणि भाजी मंडई, फ्रुट मार्केट परिसरात मोठया प्रमाणात कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत. तर काही ठिकाणी कचऱ्याचे ढिगच पेटवून दिले जात असल्याने आकाशात धुराचे लोट दिसून येत आहेत. परिणाम, नागरिक कमालीचे त्रस्त झाले असून, याबाबत संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
लातूर शहरातील गंजगोलाई परिसरात असलेल्या फ्रुटमार्केटमध्ये सर्वत्र कचऱ्याचे ढिग पडल्याचे चित्र कायम दिसून येते. तर रिंगरोड परिसरातही ठिकठिकाणी कचरा मोठया प्रमाणात पडलेला दिसून येत आहे. काही जण या कचऱ्याच्या ढिगाऱ्यालाच आग लावत आहेत. यामुळे परिसरात धुराचे लोट दिसून येत आहेत. यातून अबाल-वृद्धांना श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत आहे. रिंगरोड परिसरात छत्रपती चौक ते पाच नंबर चौक दरम्यान गोपाळ नगर येथे दोन दिवसांपूर्वी कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लावण्यात आली होती.
धुराच्या लोटात प्रमुख रस्त्याच हरवून चाललाय..लातूर शहरातील नांदेड रोडवरील एका शाळेच्या संरक्षक भिंतीलगतच भांगरातील टायर, कचरा, प्लास्टिक जाळला जात आहे. परिणामी, धुरामध्ये प्रमुख रस्त्याच हरवून चालला आहे. शिवाय, लातुरात विविध ठिकाणीही कचरा पेटवून देत प्रदूषण केले जात आहे. याबाबत संबंधित यंत्रणा कारवाईसाठी पुढे येत नसल्याने कचरा जळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.