लातूर : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री तालुक्यातील चिखुर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट देऊन पाणही केली. तेव्हा दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर कर्मचारीही अनुपस्थित होते. दरम्यान, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे.
वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुरुवारी रात्रीपासून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी रात्री आरोग्य उपसंचालक डॉ. कमल चामले यांनी गंगापूर आरोग्य केंद्रास तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी निवळी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली होती. गंगापूरच्या केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी उपस्थित होते. मात्र, निवळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली.दरम्यान, शुक्रवारी रात्री जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे यांनी लातूर तालुक्यातील चिखुर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली. तेव्हा दोन्हीही वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका आणि औषधनिर्माण अधिकारी उपस्थित नसल्याचे दिसून आले. त्याची गंभीरपणे दखल घेत या पाचही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येणार आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांच्या अचानक भेटीमुळे डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना धास्ती बसली आहे.
कारणे दाखवा नोटीस...चिखुर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली. तेव्हा दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अन्य तीन कर्मचारी अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा घेतला जाणार आहे. समाधानकारक खुलासा न आल्यास कार्यवाही केली जाणार आहे.- डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.